- विद्युत वितरण कंपनीच्या विरोधात उद्योजकांचे आंदोलन..
- चाकण MIDC पेक्षा चिखली आणि कुदळवाडीतील उद्योगं बऱ्या अवस्थेत – जयदेव अक्कलकोटे …
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ सप्टेंबर २०२३) :- चाकण MIDC पेक्षा चिखली आणि कुदळवाडीतील उद्योगं बऱ्या अवस्थेत आहेत. चाकण MIDC म्हणजे फुगवटा असून इथे अजूनही मुलभूत समस्यांचीच वानवा आहे. आम्ही एवढे उद्योग आणले, इतक्या कोट्यावधीची गुंतवणूक झाली, असं सांगणारं सरकारं येथील उद्योगांना साधी अखंडितपणे वीजही देऊ शकत नाही. त्यामुळे नवीन कंपन्या तर सोडाच, परंतु, सध्याच्या परिस्थितीत येथे सुरु असणारे उद्योगही इतर राज्यात आपला उद्योग हलविण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती चाकण MIDC उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे यांनी माध्यमांना दिली.
येथील उद्योगांना अखंडित वीज पुरवठा होत नसल्याच्या कारणावरून संघटनेच्या वतीने उद्योजकांनी एकत्रित येत खेड येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात बुधवारी (दि. ०६) रोजी आंदोलन केले. यावेळी शेकडो उद्योजक आंदोलनात सहभागी झाले होते. त्यानंतर संघटनेच्या वतीने खेड सर्कल विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना भेटून त्यांना समस्यांचे निवेदन दिले.
संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे म्हणाले, चाकण MIDC व परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरु आहे. त्यामुळे सर्व उद्योजक त्रस्त आहेत. वीज गेल्यानंतर पूर्वीप्रमाणे प्रतिसाद देखील कर्मचाऱ्यांकडुन मिळत नाही. प्रत्येक गुरुवारी वीज जाते. ती आता जनरल प्रॅक्टीस झाली आहे? उद्योजकांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत आहे. त्याचा दूरगामी परिणाम फक्त आमच्या व्यवसायावर होत नसून देशाच्या अर्थव्यवस्थेवर देखील होत आहे. काही कंपन्यांमध्ये विजेची समस्या उद्भवली की संपूर्ण फीडरला कनेक्ट असलेल्या उद्योजकांची वीज जाते. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तत्कालीन कार्यकारी अभियंता यांनी आरएमयु युनिट आणि फिडरची नव्याने उभारणी केली होती. त्यामुळे ही समस्या काही अंशी सुटली होती. आता पुन्हा ये रे माझ्या मागल्या हा प्रकार सुरु आहे. तो थांबवावा. MSEDCL ने पायाभूत प्रकल्पांवर जोमाने काम करणे गरजेचे आहे. जेणेकरून कमीत कमी ब्रेक डाऊन होऊन लवकरच Zero Break Down कडे आपली वाटचाल होईल, अशी मागणी आम्ही संघटनेच्या वतीने खेड सर्कल विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे. येत्या काही दिवसात या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघाला नाही तर, उग्र आंदोलनाचा इशारा यावेळी संघटनेने दिला आहे.
”चाकण MIDC मध्ये दहा ते बारा हजार उद्योजक आहेत. सर्वांनी कर्ज काढून उद्योग उभे केलेत. अखंडित वीज पुरवठा होत नसल्यामुळे आमच्या ग्राहकांना वेळेत मालाची डिलिव्हरी आम्ही देऊ शकत नाही. पर्यायाने लाखो रुपयांचे आमचे नुकसान होते आहे. बँका हप्त्यासाठी महिन्याला दारात उभ्या राहतात. गेल्या काही महिन्यांपासून चार तास वीज गायव होते. गुरुवार म्हणजे ठरलेलं लाईट नाहीच. लोकांनी कामं कधी करायचे? आम्ही चिखली कुदळवाडीतील छोटे व्यवसाय बंद करून चाकण एमआयडीसीत आलो. आता तीथेच बरं होतं असं वाटतंय. चाकण एमआयडीसीत येऊन मनस्ताप होतोयं”. – चाकण MIDC उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे…
”येत्या दोन महिन्यात उद्योजकांच्या सर्व अडचणी दूर करतो. उद्योगांना अखंडितपणे वीज पुरवठा होईल. त्यासाठी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन निर्देश देतो”. – मा. राजेंद्र एडके, कार्यकारी अभियंता, खेड सर्कल…