न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ सप्टेंबर २०२३) :- आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांमध्ये साक्षरतेला चालना देण्यासाठी आणि वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने १०५ पैकी ५० प्राथमिक शाळांमध्ये वर्ग ग्रंथालये उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी पिंपळे गुरव प्राथमिक शाळा क्रमांक ५४ येथे पहिल्या वर्ग ग्रंथालयांचे अनावरण अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उप आयुक्त मनोज लोणकर, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात तसेच शाळेतील शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल बोलताना आयुक्त शेखर सिंह म्हणाले, शिक्षण ही सक्षमीकरणाची गुरुकिल्ली आहे आणि साक्षरता त्याचा पाया आहे. महापालिका शाळांमध्ये वर्ग ग्रंथालये सुरू करून, आम्ही विद्यार्थ्यांना केवळ ज्ञानाचा खजिनाच देत नाही तर त्यांच्या सर्जनशीलतेला जोपासत आहोत. आम्हाला विश्वास आहे की हा उपक्रम शालेय वर्गांतील विद्यार्थ्यांमध्ये विविध विषयांबाबत कुतूहल जागृत करण्यात मदत करेल.
विद्यार्थ्यांचे भाषा कौशल्य आणि एकूण शैक्षणिक कामगिरीच्या दृष्टीने त्यांच्यासाठी वाचन अधिक सुलभ आणि आनंददायक बनविणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. प्रत्येक ग्रंथालयात इंग्रजी, मराठी, हिंदी तसेच उर्दू भाषांमधील विविध शैलीची पुस्तके विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असून अनेक मनोरंजक पुस्तकांचाही समावेश या ग्रथांलयांमध्ये असणार आहे, असे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील म्हणाले.
पुस्तकांच्या निवडीसाठी विविध संस्थांची मदत..
शाळांमध्ये हा उपक्रम योग्य पद्धतीने पद्धतीने राबविण्यासाठी तुलिका, नॅशनल बुक ट्रस्ट, तसेच पराग इनिशिएटिव्ह (टाटा ट्रस्ट), रुम टू रीड आणि आकांक्षा फाऊंडेशन यांसारख्या संस्थांनी या ग्रंथालयांसाठी पुस्तकांची निवड बारकाईने केली गेली आहे.
प्रत्येक शाळेतील एका शिक्षकाची निवड..
या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी, एक धोरणात्मक ग्रंथालय अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. यामध्ये ५० शाळांमधील प्रत्येकी एका शिक्षकाला सहभागी करण्यात आले असून या ५० शिक्षकांना त्यांच्या संबंधित शालेय संस्थांमध्ये ‘लायब्ररी चॅम्पियन’ होण्यासाठी प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. या उपक्रमातंर्गत दर आठवड्याला नवनवीन वाचन पद्धती अवलंबण्यात येतील आणि या पद्धतींद्वारे शैक्षणिक परिणामांचे विश्लेषण करण्यात येणार आहे.
१ लाख ३८ हजार विविध पुस्तके आणि ६७७ कपाटांची सोय..
वर्ग ग्रंथालयांसाठी एकूण १ लाख ३८ हजार विविध पुस्तके मागविण्यात आली असून ज्ञानाचा हा खजिना ठेवण्यासाठी वर्गांमध्ये ६७७ कपाटांची सोय करण्यात येणार आहे. ही वर्गातील ग्रंथालये विद्यार्थ्यांमध्ये केवळ वाचनाची आवडच वाढवणार नाहीत तर सुदृढ, सक्षम तरुण पिढी निर्माण करण्यासाठी प्रोत्साहनही देतील.















