- धारधार शस्त्र जप्त करुन अपहरणग्रस्त मुलाची सुटका…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ सप्टेंबर २०२३) :- १४ वर्षांच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या तीन आरोपींना गुन्हे शाखा युनिट चारने अडीच तासात बेडया ठोकल्या आहेत. धारधार शस्त्र जप्त करुन अपहरणग्रस्त मुलाची सुटका केली आहे.
ताथवडे येथ एका भंगार व्यवसायिकाच्या मुलाचे (दि. १२) रोजी सुमारे ७.०० वा. गाडीमधुन आलेल्या तीन इसमांनी अपहरण केले होते. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट ४ च्या सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांनी मुलाच्या अपहरणाचा तपास सुरु केला. सी.सी.टी.व्ही फुटेजची पाहणी केली असता त्यात तीन इसम हे एका निळया रंगाच्या झेन गाडीमध्ये अपहरण केलेल्या मुलास घेवुन जात असल्याचे पोलिसांना दिसत होते. त्याच दरम्यान गुन्हे शाखा युनिट-४ ने अपहरण केलेल्या मुलाचे काका यास ताब्यात घेवुन त्याच्याकडे चौकशी करून माहिती काढण्यास सांगितले होते. त्याच दरम्यान अपहरण झालेल्या मुलांच्या काकास वेगवेगळ्या मोबाईल क्रमांका वरून फोन करून एका इसम “३० लाख रुपयाची खंडणी दे नाही तर तुमच्या मुलाचे हात-पाय तोडुन त्यास मारुन टाकतो” अशा प्रकारचा खंडणीचा फोन करत होते.
तेव्हा अपहरण करणाऱ्या इसमा बाबत मिळालेल्या तांत्रिक विश्लेषणावरुन अपहरण करणारे इसम हे सासवड परिसरात असल्याबाबत माहिती प्राप्त झाल्याने पोलीस लागलीच सपोनि देशमुख, दरोडा विरोधी पथक व पोउपनि रायकर, गुन्हे शाखा युनिट-४ यांची दोन वेगवेगळी पथके तयार करुन सदर ठिकाणी रवाना केली. तसेच त्या दरम्यान पोलिसांनी तात्काळ नाकाबंदी केली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या दोन्ही पथक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे व सासवड पोलीस ठाणे यांनी योग्य तो समन्वय साधुन तात्काळ प्रतिसाद दिल्याने आवघ्या अडीच तासात सापळा लावुन पोलिसांनी आरोपी १) तेजस ज्ञानोबा लोखंडे (वय-२१ वर्षे, रा. दत्त मंदिर शेजारी, मारुंजीगाव, २) अर्जुन सुरेश राठोड )वय- १९ वर्षे, रा.दत्त मंदिर शेजारी. मारुंजीगाव ३) विकास संजय मरके (वय-२२ वर्षे, रा. शिवार वस्ती, भुमकर चौक) या खंडणीखोर तीन आरोपींना शिताफीने झेन गाडीसह ताब्यात घेवुन त्यांच्या तावडीतुन अपहरण झालेल्या मुलाची सुटका करण्यात यश मिळाले आहे.
आरोपीकडे मिळुन आलेल्या गाडीची पाहणी केली असता त्यात तीन मोबाईल फोन, ०१ छत्ऱ्याचे पिस्टल, ०१ अडीच फुट लांबीचा कोयता, ०५ सुरा, छत्री, हातोडा, ०२ मास्क असा मुद्देमाल जप्त केला असून त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी केली असता सदर आरोपी यांनी अपहरण केलेल्या मुलाच्या वडीलांबाबत माहिती काढली होती की त्याचा भंगाराचा व्यवसाय असून त्याच्याकडे खुप पैसे आहेत. त्याच्या मुलाचे अपहरण केले तर खुप पैसे मिळु शकतात. त्यासाठी त्यांनी पाच दिवस सदर मुलाचे अपहरण करण्यासाठी रेकी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच त्यांना हॉटेलचा व्यवसाय सुरु करण्यासाठी पैशाची आवश्यकता असल्याने त्यांनी सदर मुलाचे अपहरण केले असल्याचे तपासात निष्पन्न होत आहे. तसेच सदर आरोपींनी खंडणी मागण्याकरिता वापरलेले मोबाईल फोन हे भुमकर चौक व मारुंजी परिसरातुन चोरी केल्याचे तपासात निष्पन्न झाले असुन सदर आरोपींना पुढील तपासकामी हिंजवडी पोलीस ठाणे, गु.र.नंबर- १०६६/२०२३ भा.दं.वि. कलम ३६४ (अ) या गुन्हयाचे तपासकामी ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप-आयुक्त, काकासाहेब डोळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, स्वप्ना गोरे, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे सतिष माने, सहा. पोलीस आयुक्त हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-४, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे, दरोडा विरोधी पथक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक शिंदे, समोनि, अंबरिष देशमुख, दरोडा विरोधी पथक, सपोनि सिद्धनाथ बाबर, पोउपनि गणेश रायकर, सहा.पो.उप.नि. नारायण जाधव, संजय गवारे, दादा पवार, पोहवा/ प्रविण दळे, तुषार शेटे, मोहम्मद गौस नदाफ, रोहिदास आडे, पोना/ वासुदेव मुंडे, सुरेश जायभायें, पोशि/ प्रशांत सैद, सुखदेव गावडे तांत्रिक विश्लेषण विभाग गुन्हे शाखा चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय तुंगार, स.पो.नि. सागर पानमंद, पोहवा/नागेश माळी, पोपट हुलगे यांनी केली आहे.


















