न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ सप्टेंबर २०२३) :- मावळ तालुक्यातील सांगवडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आदर्श मुख्याध्यापक संदीप सकपाळ यांना नुकताच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते पुणे जिल्हा परिषदेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुणे येथील अल्पबचत भवन येथे झालेल्या कार्यक्रम प्रसंगी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापू भेगडे, सर्व तालुक्याचे गट शिक्षाधिकारी आदी उपस्थित होते.
संपुर्ण डिजिटल स्कूल, अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर, स्वत:ची शाळाच नाही तर संपूर्ण तालुका डिजिटल करण्याच्या ध्यासाने मावळ तालुक्यातील १३० शाळांना लॅपटॉप व टॅब मिळवून दिले. CSR अंतर्गत आतापर्यंत सव्वा करोड रुपये उपलब्ध केलेले आहेत.
संदीप सकपाळ यांना यापूर्वी पुणे जिल्हा परिषदेचा शिष्यवृत्ती पुरस्कार, मावळ पंचायत समितीचा आदर्श शिक्षक पुरस्कार, पर्यावरप्रेमी पुरस्कार, पिंपरी चिंचवड पर्यावरण पुरस्कार, पोलिस मित्र पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
पुरस्कार प्राप्तीबद्दल केंद्रप्रमुख विजय मारणे शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षण अधिकारी सुदाम वाळुंज, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, आमदार सुनील शेळके यांनी अभिनंदन केले. तसेच सांगवडे गावचे सरपंच रोहन जगताप, उपसरपंच योगेश राक्षे, कासारसाई संत तुकाराम कारखान्याचे संचालक ज्ञानेश्वर राक्षे, संचालक अमोल मोकाशी व शाळा व्यवस्थापन समिती सांगवडे यांनीही अभिनंदन केले आहे.















