- मेट्रो मार्गाच्या कामाला गती देण्याची केली सूचना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ सप्टेंबर २०२३) :- पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) हिंजवडी-शिवाजीनगर या मेट्रो मार्गाचे काम सध्या सुरू आहे. या कामांतर्गत माण (ता. मुळशी) १३.२ हेक्टर जागेत मेट्रो मार्गिका कार डेपोचे काम सुरू आहे. त्याची स्थळ पाहणी पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल यांनी गुरुवारी (दि. १४) केली. तसेच, येथील कामकाजाचा आढावा घेतला.
माण येथे पीएमआरडीएकडून मेट्रो मार्गिकेच्या कार डेपोसाठी संपादित केलेल्या जागेत मेट्रो बोगीची देखभाल-दुरुस्ती होईल. येथे स्टोरेज युनिट, तपासणीची जागा, वॉशिंग वे, चाचणीसाठी ट्रॅक, कार्यालयीन इमारत बांधण्यात येईल. उभारण्यात येणाऱ्या इमारतीच्या छतासाठी ७५० मेट्रिक टन इतक्या स्टीलचा वापर होईल. पीएमआरडीए आयुक्त महिवाल यांनी येथील कामाची स्थळ पाहणी केली. उभारण्यात येणाऱ्या इमारती आणि ट्रॅक लेइंग कामांचा आढावा घेतला. तसेच, येथे सुरु असलेल्या विविध कामांचे पूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
पीएमआरडीएकडून हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो लाईन ३ चे काम सध्या सुरू आहे. एकूण २३ किलोमीटर लांबीचा हा मार्ग आहे. या मेट्रो प्रकल्पाच्या उभारणीसाठी बांधा, आर्थिक पुरवठा करा, चालवा आणि हस्तांतरित करा, या तत्त्वाचा अवलंब केला आहे. या प्रकल्पासाठी सार्वजनिक खासगी सहभाग घेण्यात आला आहे. हा प्रकल्प राज्य शासनाने महत्त्वपूर्ण नागरी प्रकल्प म्हणून घोषित केला आहे.