न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू वार्ताहर (दि. २० सप्टेंबर २०२३) :- आपल्या लाडक्या गणरायाचे वाजत-गाजत आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात देहूकरांनी स्वागत केले. मंगळवारी सकाळपासूनच नागरिकांची गणरायाच्या स्वागताची तयारी सुरू होती. दहा दिवसांच्या पूजेची तयारी करण्यात गणेशभक्त व्यस्त दिसत होते. तसेच, मंदिर आणि घराची सजावट करण्यात आली होती.
देहू शहरातील सार्वजनिक मंडळांच्या मंडप बांधणीचे कामदेखील पूर्ण झाले होते. त्यामुळे घरगुती आणि सार्वजनिक मंडळाच्या अगदी ५ ते १० फूट उंची असलेल्या मूर्तीचेही पारंपरिक ढोल- ताशांच्या गजरात आगमण झाले. या वेळी चिमुकल्यांचा उत्साह शिगेला पोहोचलेला दिसत होता.
देहूगावमधील महाप्रवेशद्वार ते जुनी ग्रामपंचायत तसेच कासार आळी चौक या भागातील दुकानांमध्ये सजावटीचे आणि पूजेचेसाहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
सुदुंबरे गावात विविध सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने सायंकाळी ५ च्या सुमारास भव्य मिरवणूक काढण्यात आली. ढोल- ताशे, लेझीम, झांज आदींसह डीजे व फटाक्यांची आताषबाजी करण्यात आली. यामध्ये गावातली विविध सार्वजनिक गणेश मंडळांनी सहभाग घेतला.
सायंकाळी मिरवणुकीनंतर मोठ्या भक्ती भावाने गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. दिवसभर घरोघरी गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली. परिवारातील सदस्य आपल्या घरी बाप्पांना मोठ्या भक्ती भावाने घरी घेऊन आले. लहान मुलांचा उत्साह व आनंद ओसंडून वाहत होता.