- परिसरात मंगलमय आणि उत्साहवर्धक वातावरण…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० सप्टेंबर २०२३) :- गणपतीबाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया…’ अशा जयघोषात आणि ढोल-ताशांच्या निनादात, जल्लोषी मिरवणुकांद्वारे उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहरात मंगळवारी गणरायांचे आगमन झाले. शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या आणि घरगुती गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणेशभक्तांच्या अपूर्व उत्साहात आनंद सोहळ्यास सुरुवात झाली.
पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीमध्ये दोन दिवसापासून वातावरण गणेशमय झाले आहे. श्री गणेश प्रतिष्ठापनेचा मुहूर्त सकाळपासून दुपारी पावणेदोनपर्यंत होता. त्यामुळे घरगुती गणरायाची स्थापना करण्यासाठी सकाळच्या टप्प्यात लगबग दिसून आली. रस्त्यारस्त्यांवर ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया…’ असा जयघोष सुरू होता.
डोक्यावर टोपी, कुर्ता-पायजमा परिधान करून बच्चे कंपनी छोटे ढोल, टाळ वाजविताना दिसून आली. कुटुंबच्या कुटुंब पारंपरिक वेशभूषा करून गणपती विक्री स्टॉलवर येऊन मूर्ती घेऊन जाताना दिसत होते. दुचाकी, चारचाकी वाहनांवर तसेच चालत गणेशभक्त गणरायाला घरी घेऊन जात होते. पूजा साहित्याची जमवाजमव आणि स्टॉवरून मूर्ती आणणे, आरास सजावट यासाठी लगबग सुरु होती. सकाळच्या टप्प्यात घरगुती गणरायाचे आगमन झाले. त्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची लगबग सुरू होती. गणेशभक्तांचा अपूर्व उत्साह दिसून आला.
दुपानंतर उपनगरांमधील सार्वजनिक मंडळांची मिरवणूक सुरू झाली. मावळ आणि मुळशी परिसरातील ढोलपथके सहभागी झाली होती. सर्वत्र गणेशाचा महिमा सांगणारी गाणी ध्वनिक्षेपकावर सुरू होती. त्यामुळे वातावरण गणेशमय झाले होते. पिंपरी गाव, चिंचवड, भोसरी, सांगवीसह उपनगरांमध्ये मिरवणूक काढण्यात आल्या. ढोल-ताशांच्या दणदणाटात उत्सवी मिरवणुका काढून गणरायांची प्रतिष्ठापना करण्यात आली.
गणेशोत्सवासाठी पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. उत्सवावर सीसीटीव्हीची नजर आहे. महापालिकेने दीड दिवसांच्या गणेश विसर्जन करण्यासाठी पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांच्या विसर्जन घाटावर सज्जता केली आहे. नदी प्रदूषण टाळण्यासाठी घाटावर निर्माल्य कुंड आणि कृत्रिम हौद तयार करण्यात आले आहेत. गर्दीच्या भागातील वाहतूक वळविण्यात आली आहे.

















