- ‘घरच्यांसह सगळ्यांची गेम करुन उडवुन देण्याची धमकी’…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ सप्टेंबर २०२३) :- आळंदी फाटा येथून एकतानगर, चाकण येथे दुचाकीवरून घरी जात असताना पाठीमागुन आलेल्या रिक्षामधील सहा जणांच्या टोळक्याने फिर्यादीच्या दुचाकीसमोर रिक्षा आणली. ‘तु रिक्षास धडक मारली आहे, नुकसान भरून दे’ असे म्हणुन फिर्यादी यांचा मोबाईल फोन व मोटार सायकलची चावी घेतली. बळजबरीने फिर्यादी उद्योजकाला रिक्षात बसवुन शिरोली येथे एका शेतात अंधारात नेत रात्री शेतात डांबुन ठेवले. फिर्यादीच्या उजव्या पायाच्या गुडघ्यावर ‘तुझा व्यवसाय मोठा आहे, तुला आम्हाला एक कोटी रुपये द्यावे लागतील तरच तुला सोडु नाही तर तुझी व तुझे घरच्यांची सगळ्यांची गेम करु उडवुन टाकु’ अशी धमकी दिली.
फिर्यादी यांची सँग उघडुन त्यातील २०,००० रुपये जबरीने काढुन घेतले. दोन दिवसात कमीत कमी १२ लाख रुपये दिले नाही तर, तुला व तुझ्या घरच्यांना संपवुन टाकु, अशी धमकी देवुन नंतर सारा सिटी येथे मोटार सायकलवरुन आणुन फिर्यादीला आरोपींनी सोडुन दिले. त्यानंतर पुन्हा वेगवेगळ्या नंबरवरून फिर्यादी यांना फोन करुन सात लाख रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाही तर, फिर्यादी व त्यांच्या घरच्यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. २१/०९/२०२३ रोजी रात्री ९.१५ ते दि. २३/०९/२०२३ रोजी सायंकाळी ५.४५ वा पर्यंत) नाशिक रोडवर, भंडारा हॉटेलसमोर, शिरोली येथून मोठया पुलावर घडला. फिर्यादी संजय धुलाप्पा कुरुंदवाडे (वय ५५ वर्षे, व्यवसाय उद्योजक, रा. चाकण) यांनी आरोपी १) आकाश विनायक भुरे (वय २२ वर्षे, रा. नाणेकरवाडी, ता. खेड, जि. पुणे), २) शुभम सरोदे, ३) अजय येलोटे, ४) सोहेल पठाण, ५) पन्या गोसावी (पुर्ण नावे माहीती नाही) तसेच एक अनोळखी इसम यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चाकण पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात ७५५/२०२३ भादवि का क ३९५,३६४ (अ) ३८७ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून एकाला अटक करण्यात आली आहे. सपोनि गायकवाड पुढील तपास करीत आहेत.