- मिळकतकर आणि पाणीपट्टीची १५ कोटींपेक्षा अधिकची थकबाकी..
- लोकंहो विकासकामे करायची कशी?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ सप्टेंबर २०२३) :- देहू नगरपंचायत हद्दीतील मिळकतकर आणि पाणीपट्टीची १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी आहे. नागरिकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्यामुळे याचा परिणाम विकासकामांवर होणार आहे.
नगरपंचायत प्रशासनाने पाणीपट्टीची केवळ ७ लाख ९३ हजार तर मिळकतकराच्या एकूण थकबाकीपैकी १ कोटी १२ लाख रुपये इतकी वसुली झाली आहे. प्रशासनाने थकबाकीपैकी ८० टक्के पाणीपट्टी व मिळकतकर वसूल करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. त्यासाठी निद्रावस्थेत असलेल्या थकबाकीदारांना जागृत करण्यासाठी थकबाकीदारांच्या दारात जाऊन ढोल बजाव मोहिमेचा अवलंब करण्यात येणार आहे. तरीही नागरिकांनी कर न भरल्यास संबंधितांची मालमत्ता सील करण्यात येणार असल्याचे, देहू नगरपंचायतीचे कार्यालयीन अधीक्षक राम खरात यांनी सांगितले.
मिळकत कराची मागील थकबाकी ९ कोटी १५ लाख ९२ हजार ९६६ रुपये होती. तसेच, यावर्षी ३ करोड ७० लाख ६९ हजार ७५६ रुपये थकबाकी आहे. एकूण १२ करोड ८६ लाख ६२ हजार ७२२ रुपये एकूण रक्कम मिळकत करापोटी थकबाकी आहे. या एकूण थकबाकी रक्कमेच्या फक्त १ कोटी १२ लाख रुपये वसूल झाले आहेत. पाणी पट्टीची एकूण ३ कोटी ४८ लाख २४ हजार रुपये थकबाकी आहे. पाणीपट्टी आणि मिळकत कराची एकूण १५ कोटींपेक्षा जास्त थकबाकी वसूल करण्याचे मोठे आव्हान देहू नगरपंचायतीपुढे उभे आहे. त्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असल्याचे कर विभागाचे ज्ञानेश्वर शिंदे यांनी सांगितले.