- रिंगरोडची मोजणी व सीमांकनाच्या कामाला शेतकऱ्यांची हरकत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू वार्ताहर (दि. ३० सप्टेंबर २०२३) :- महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने इंदोरीतील शेतकऱ्यांना विश्वासात न घेता निश्चित केलेल्या रिंगरोडमध्ये बदल केल्याने बाधित शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. रिंगरोडला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला असून, रिंगरोड क्षेत्राची मोजणी व सीमांकनाचे काम शेतकऱ्यांनी पुन्हा थांबवले.
राजपत्रानुसार रिंगरोडची पाहणी व मोजणी करून जागेवर चिरे लावून सीमांकन केले होते. या बाबत शेतकऱ्यांचा विरोध नव्हता. कारण रिंगरोडचा बराच भाग वनक्षेत्र व शासकीय गायरानातून जात होता. त्याला केवळ भंडारा डोंगर देवस्थान समितीने विरोध केला होता. परंतु पूर्ण माहिती घेऊन त्यांनीही आपला विरोध मागे घेऊन तसे लेखी पत्र सरकारला दिले. त्याच दिवशी ‘एमएसआरडीसी’चे कार्यकारी संचालक राजेश मोपलवार यांच्याबरोबर मुंबई कार्यालयात माजी राज्यमंत्री बाळा भेगडे याच्या नेतृत्वाखाली शेतकरी शिष्टमंडळाची बैठक झाली. सकारात्मक चर्चा झाली व पुन्हा २३ जुलै रोजी पुण्यात बैठक घेण्याची हमी देण्यात आली. मात्र, पुन्हा २० सप्टेंबर रोजी रिंगरोडसाठी मोजणी व सीमांकन करण्यासाठी अधिकारी आले.
सुमारे पन्नास शेतकऱ्यांनी शांततेने ‘एमएसआरडीसी’चे उपअभियंता गोविंद गायकवाड यांच्याकडे बाजू मांडली. विनंती करून मोजणीचे काम थांबविले. कोणाचा विरोध न होणारा व कोणावर ही अन्याय न होणारा शिवाय खर्चाची मोठी बचत होणारा पर्याय ही गायकवाड यांच्यापुढे मांडला व समक्ष येऊन पाहणी करण्याची शेतकऱ्यांनी विनंती केली. शासकीय आदेशानुसार आम्ही काम करतो. शेतकऱ्यांची बाजू वरिष्ठांकडे सांगण्यात येईल. शेतकऱ्यांबरोबर लवकरच बैठक घेण्याचा प्रस्तावही वरिष्ठांपुढे ठेवण्यात येईल, अशी ग्वाही उपअभियंता गायकवाड यांनी शेतकऱ्यांना दिली. मोजणी करून चिरे लावून सीमांकन केलेला मार्गच निश्चित करावा. अन्यथा बदल केल्यास शेतकरी व अनेक बाधित शेतकरी देशोधडीला लागतील. या उपरही शेतकऱ्यांना धुडाकावले गेल्यास आत्मदहनाचा इशारा तुकाराम काळे यांनी दिला तर ईश्वर महाराज ढोरे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला.
संबंधित अधिकाऱ्यांनी समक्ष येऊन पाहणी करावी. शेतकऱ्यांशी चर्चा करावी. १९ मे २०२१ रोजीच्या राजपत्रानुसार मोजणी करून निश्चित केलेला रिंगरोडचा मार्गच निश्चित करावा. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नंदकुमार ढोरे, मनोहर काशीद, कृष्णा भसे, मधुकर ढोरे, संदीप काशीद, विष्णू शिंदे, चंद्रकांत काशीद यांनी दिला.












