न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० सप्टेंबर २०२३) :- लर्निंग लायसन्स असो किंवा आरटीओ कार्यालयाशी संबंधित प्रत्येक कामासाठी पूर्वी नागरिकांना आरटीओत वारंवार चकरा माराव्या लागायच्या. पण, शासनाने आरटीओ कार्यालयाशी संबंधित अनेक बाबी ऑनलाइन केल्याने सर्वसामान्यांना आरटीओ कार्यालयात न जात घरबसल्या त्यांचे काम करता येत आहे.
यात लर्निंग लायसन्स, ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण इप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स, ड्रायव्हिंग लायसन्स पत्ता बदलणे यासह इतर अनेक सुविधा ऑनलाइन दिल्या जात आहेत. यानंतर लर्निंग टेस्ट पर्याय येईल. तो पर्याय निवडल्यावर एक माहितीपर व्हिडीओ दिसतो. पासवर्ड टाकून ऑनलाइन टेस्ट देता येते.
ऑनलाइन अर्ज कसा कराल?…
■ नागरिकांना आरटीओच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करता येतो. यावेळी दोन पर्याय समोर दिसतात. एक फेसलेस आणि दुसरा आरटीओत जाऊन ऑफलाइन अर्ज सादर करायचा पर्याय आहे.
■ फेसलेस पर्याय निवडल्यास नागरिकांना आधार क्रमांक टाकावा लागतो. यानंतर आधारवरील माहिती आणि फोटो आपोआप भरला जातो. तर सही, पत्ता आणि वयाचा पुरावा असणारे डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात. यानंतर आरटीओची फी भरावी.
आरटीओच्या सेवा ऑनलाइन झाल्यामुळे नागरिकांना घरबसल्या लर्निंग लायसन्स काढता येत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या आठ महिन्यांत १ लाख १९ हजार २५७ नागरिकांनी ऑनलाइन लर्निंग लायसन्स काढले आहे. दिवसेंदिवस यात वाढ होत असून, यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैशाची बचत होत आहे. लर्निंग लायसन्स काढताना ऑनलाइन परीक्षा देण्याचा पर्याय आहे. पण, वेब कॅमेरा असेल तरच परीक्षा देता येणार आहे.
ऑनलाइन लर्निंग लायसन्स काढताना घरून टेस्ट देताना आजूबाजूचा आवाज आल्यावर, परीक्षा देणाऱ्याच्या मागून कोणी गेल्यावर परीक्षा पास होऊनदेखील तांत्रिक कारणामुळे लर्निंग लायसन्स तयार होत नाही आणि आरटीओत संपर्क साधा, असा मेसेज येतो.













