- पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची माळ पुन्हा अजित पवारांच्या गळ्यात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ ऑक्टोबर २०२३) :- पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासह राज्यातील अकरा जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.
अजित पवार यांनी काही आमदारांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड करुन शिंदे सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. यानंतर अजित पवार यांना पुण्याचा पालकमंत्री करा, अशी मागणी जोर धरु लागली होती. त्यामुळे लवकर अजित पवार यांनी पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी मिळणार असल्याचं बोललं जाऊ लागलं होतं. त्यामुळे पुण्याचे विद्यमान पालमंत्री आणि भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी असताना भाजपचा कसबा पोटनिवडणुकीत लाजीरवाणा पराभव झाला होता. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्याविषयी भाजपात नाराजी होती. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी केली असून त्यांना अमरावती/सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री केले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुण्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे.
सुधारित ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे :-
पुणे- अजित पवार
अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील
सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील
अमरावती- चंद्रकांत दादा पाटील
भंडारा- विजयकुमार गावित
बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर- हसन मुश्रीफ
गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम
बीड- धनंजय मुंडे
परभणी- संजय बनसोडे
नंदूरबार- अनिल भा. पाटील
वर्धा – सुधीर मुनगंटीवार











