- निवडणुक घेण्याबाबत कोर्टाचा निवडणूक आयोगाला आदेश नाहीच…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिपरी (दि. 4 ऑक्टोबर. 2023) :- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना कोर्ट दरबारी मुहुर्त मिळेना. याचिकेवरची सुनावणी सुप्रीम कोर्टात आज (बुधवारी) होणार होती. मात्र, ही सुनावणी झालीच नाही. त्यामुळे आजी-माजीसह भावी नगरसेवकांचा जीव पुन्हा टांगणीला आहे.
निवडणुकीबाबत आज बुधवारी सुनावणी असल्यामुळे अपेक्षित निकालासाठी अनेकजणांनी आपले देव पाण्यात बुडवून ठेवले होते. तर, अनेकजण देव दर्शनाला गेले होते. आज तरी सुनावणीत निवडणुक घेण्याबाबत कोर्ट निवडणूक आयोगाला निर्देश देईल, अशी भाबडी आशा लावणाऱ्यांचा पुन्हा एकदा हिरमोड झाला आहे.
राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे, मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. पुढील सुनावणी २८ नोव्हेंबरला होणार आहे. त्यामुळे जवळपास दोन महिने सुनावणी लांबणीवर पडली आहे. त्यामुळे या वर्षा अखेरपर्यंत राज्यातील महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषदेच्या निवडणुका होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या निवडणुका आता लोकसभा निवडणुकांनंतरच होतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
राज्यातील महापालिकेचा कार्यकाळ हा मार्च २०२२ मध्ये संपला आहे, तर जिल्हा परिषद व पंचायत समितीची मुदत मार्च २०२२ मध्ये संपली आहे. तर राज्यातील १९२ नगरपालिका व जिल्हा परिषदेचा कार्यकाळ नोव्हेंबर २०२१ मध्ये पूर्ण झाला आहे. त्यामुळे मुदत संपून जवळपास दीड ते दोन वर्षाचा कालावधी लोटला तरीही या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पदाधिकाऱ्यातून नाराजी व्यक्त करण्यात येत होती.











