- ऑर्डरसाठी चाळीस हजारांची लाच घेताना विस्तार अधिकारी रंगेहाथ अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑक्टोबर २०२३) :- लोहगड ग्रामपंचायतीमध्ये सोलार प्रकल्प कामाची ऑर्डर काढण्यासाठी येथील विस्तार अधिकाऱ्याला ४० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई गुरुवारी (दि. ५) दुपारी ३ वाजता मावळ पंचायत समिती कार्यालयात करण्यात आली.
अंकुश किसन खांडेकर (वय ५७) असे लाच प्रकरणी अटक केलेल्या विस्तार अधिकाऱ्याचे नाव आहे. खांडेकर यांच्यावर लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खांडेकर हे मावळातील १७ ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून कार्यरत होते. लोहगड ग्रामपंचायतीमध्ये सोलार प्रकल्प कामाची ऑर्डर काढण्यासाठी त्यांनी तक्रारदार यांच्याकडे तब्बल ४० हजारांची लाच मागितली होती. तसेच त्यांच्यासह आणखी एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.
चार दिवसांपूर्वी तळेगाव नगरपरिषदेत एक कर्मचारी लाच घेताना पकडला गेला होता. मावळ तालुक्यात मागील काही काळात अनेक अधिकारी लाच घेताना रंगेहाथ पकडले गेले असताना देखील येथील लाचखोरी थांबत नाही. मुंबई व पुणे या दोन्ही महत्वाच्या शहराच्या मध्यांवर असलेला मावळ तालुका असल्याने याठिकाणी येण्यासाठी अधिकारी वर्ग मोठ्या प्रमाणात सेटिंग लावत खुर्ची मिळवतात. त्यानंतर अर्थकारणाला सुरुवात होते. मागील काही घटनांवरून हे अधोरेखित होत आहे.












