न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ ऑक्टोबर २०२३) :- मेट्रो प्रशासनाने विद्यार्थ्यासाठी पास सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारपासून (दि. ६) विद्यार्थ्यांना हे पास दिले जाणार आहेत. पास घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मेट्रो तिकिटात ३० टक्के सवलत दिली जाणार आहे.
पिंपरी ते सिव्हिल कोर्ट आणि वनाज ते रामवाडी या दोन्ही विस्तारित मेट्रो मार्गिकेचे १ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन उद्घाटन केले होते. जास्तीत जास्त नागरिकांनी मेट्रोतून प्रवास करावा यासाठी प्रशासनाकडून विविध सवलती जाहीर केल्या आहेत. शुक्रवारपासून पुणे मेट्रोतून दैनंदिन प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रीपेड पास’ कार्ड सुरू करण्याचा निर्णय मेट्रोने घेतला. तिकिट दरात ३० टक्के सवलत जाहीर केली आहे
१३ वर्षांपेक्षा अधिक वय असणारे विद्यार्थी हे कार्ड घेऊ शकतात. महाविद्यालयाचे अधिकृत ओळखपत्र किंवा चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाइड आवश्यक असेल. कार्डची वैधता तीन वर्षे असणार आहे. हे बहुउद्देशीय कार्ड असून, ते मेट्रो प्रवासाबरोबरच भारतात कुठेही रिटेल पेमेंटसाठी वापरले जाऊ शकते. या कार्डद्वारे दोन हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार करता येऊ शकतात.












