न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ ऑक्टोबर २०२३) :- दरवर्षी होणारा ‘दुर्गमहर्षी प्रमोद मांडे स्मृती पुरस्कार सोहळा’ यंदा ‘नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळा, फुलगाव’ येथे आयोजित करण्यात येणार आहे. (दि. १७) रोजी हा सोहळा पार पडणार आहे.
मागील सहा वर्षांपासून दुर्गक्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींचा ‘दुर्गपाईक’ तर क्रांतिकारकांच्या जीवनावर अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना ‘क्रांतीपाईक’ पुरस्कार देऊन सन्मानित करत आहेत.
यंदा, ‘दुर्गपाईक’ पुरस्कारासाठी आनंद पाळंदे यांची पुरस्कार निवड समितीने एकमताने निवड केली. महाराष्ट्रातील दोन-तीन पिढ्या गडकिल्ल्यांकडे नेण्याचे महान कार्य ज्यांच्या लेखणीतून आणि भटकंतीतून घडले, त्या आनंद पाळंदे यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रु १०,००० रोख असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
त्याचबरोबर, ‘शहीद भगतसिंह समग्र वाड्मय’ चे मुख्य संपादक, भगतसिंहांचा वसा व वारसा आपल्या कार्यातून पुढे नेण्याचा अभ्यास करणारे अभ्यासक, क्रांतिकारक व सामाजिक प्रश्नांवर मागील ४० वर्षांपासून जनजागृती करणारे दत्ता देसाई यांना यंदाचा ‘क्रांतीपाईक’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याही पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, मानपत्र आणि रु १०,००० रोख असे आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.