- ६२ रुपयांत पाच लाखांचा तर २० रुपयांत एक लाखाचा मिळणार विमा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ ऑक्टोबर २०२३) :- राज्यातील अकृषी विद्यापीठे, तंत्रशिक्षण विद्यापीठ, संलग्न महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांसाठी नव्या स्वरुपात विद्यार्थी जीवन आणि अपघात विमा योजना लागू करण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना ६२ रुपयांत पाच लाखांचा अपघात विमा, तर २० रुपयांत एक लाखाचा विमा मिळणार असून, विद्यार्थी वैद्यकीय विमा योजनेत ४२२ रुपयांत दोन लाखांचे संरक्षण मिळणार आहे.
उच्च शिक्षण विभागाने याबाबतचा शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध केला. उच्च शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली विमा योजनांसाठी समिती स्थापन करण्यात आली होती. समितीच्या शिफारसींनुसार विद्यार्थी विमा योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. योजनेच्या अंमलबजावणीसाठी आयआरडीए परवानाधारक विमा कंपनी निवडण्यात आली.
विद्यार्थी वैयक्तिक अपघात विमा आणि विद्यार्थी वैयक्तिक विमा योजनेसाठी आयसीआयसीआय लोम्बार्ड विमा कंपनीची, तर विद्यार्थी वैयक्तिक अपघात विमा योजनेसाठी नॅशनल इन्शुरन्स कंपनीची निवड करण्यात आली. नॅशनल इन्शुरन्स कंपनीकडून अपघात विमा योजनेतील पाच लाखांच्या विमा संरक्षणासाठी ६२ रुपये भरावे लागणार आहेत.
आयसीआयसीआय लोम्बार्डच्या एक लाख रुपयांच्या अपघात विम्यासाठी २० रुपये, तर दोन लाख रुपयांच्या अपघात विम्यासाठी ४२२ रुपये भरावे लागतील. विशेष म्हणजे या योजनेत विद्यार्थ्यासोबतच त्याच्या पालकांपैकी एका व्यक्तीलाही हे संरक्षण मिळणार आहे. विमा योजना ऐच्छिक स्वरुपाच्या असल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालयांनी संबंधित कंपन्यांतून निवड करून या योजना विद्यार्थ्यांसाठी लागू कराव्यात. संबंधित विमा कंपन्यांचे विमा संरक्षण दर तीन वर्षांसाठी स्थिर असतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.