न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑक्टोबर २०२३) :- समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले असले पाहिजे. त्यासाठी संतुलित आहाराचा दैनंदिन जीवनात अवलंब केला पाहिजे, असा सल्ला जहांगीर हॉस्पिटलच्या क्लिनिकल न्यूट्रिशन प्रमुख आणि इंडियन असोसिएशन फॉर पॅरेंटरल ॲण्ड एक्सटर्नल न्यूट्रिशन (आयपेन) पुणे चॅप्टरच्या मानद सचिव आहारतज्ज्ञ डॉ. रिचा शुक्ला यांनी दिला.
जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधत योग्य पोषण आणि सर्वांगीण तंदुरुस्तीचे महत्त्व याविषयी जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने, पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या (पीसीयू) स्कूल ऑफ सायन्सेसने, ‘न्यूट्रिसोल’ हे आरोग्य प्रदर्शन आयोजित केले होते.
यावेळी प्रभारी कुलगुरू डॉ. मणिमाला पुरी, प्रकुलगुरू डॉ. राजीव भारद्वाज, प्रबंधक डॉ. डी. एन. सिंग, स्कूल ऑफ सायन्सच्या प्रमुख डॉ. रुचू कुथियाला, विविध विद्या शाखांचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी स्कूल ऑफ सायन्स अंतर्गत मॉडेल आणि प्रोटोटाइपिंग लॅबचे उद्घाटन करण्यात आले. तसेच कर्मचारी, विद्यार्थी यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यामध्ये एस. बी. पाटील पब्लिक स्कूलचे विद्यार्थीही सहभागी झाले होते.
डॉ. शुक्ला म्हणाल्या, बदलती जीवनशैली, विद्यार्थ्यांना आजच्या स्पर्धात्मक युगात भेडसावणारे शैक्षणिक ताणतणाव, कामाचा ताण यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. भविष्यात आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू नयेत यासाठी नेहमी आनंदी राहावे आणि योग्य प्रमाणात संतुलित आहार घेतला पाहिजे.
डॉ. मणीमाला पुरी यांनी सुदृढ शारीरिक मानसिक आरोग्याचे महत्त्व विशद केले. डॉ. राजीव भारद्वाज यांनी मनोगत व्यक्त केले. स्वागत आणि आभार डॉ. रुचू कुथियाला यांनी मानले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.