न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० ऑक्टोबर २०२३) :- कासारवाडी येथील मुलींच्या आयटीआय इमारतीमध्ये असलेले ‘ह ‘क्षेत्रीय कार्यालय हे आता संत तुकारामनगर मेट्रो स्टेशनसमोरील आयसीसी देवी टॉवर शेजारी बांधण्यात येणार आहे. या सुधारित प्रस्तावाला आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे.
ह क्षेत्रीय कार्यालय कासारवाडीतील शंकरवाडी येथील कलासागर हॉटेलशेजारी आयटूआर अंतर्गत मिळालेल्या जागेवर बांधण्यात येणार होते. नाशिक फाटा चौकाजवळ ही इमारत बांधली जाणार असल्याने नागरिकांना तसेच, अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोईस्कर ठरणार होती. त्यास आयुक्तांनी १८ ऑक्टोबर २०२२ ला मान्यता दिली होती.
दरम्यान, नगररचना विभागाकडे संत तुकाराम नगर मेट्रो स्टेशनसमोरील आयसीसी देवी टॉवरची जागा आयटूआर अंतर्गत ताब्यात आली आहे. ही जागा आयताकृती असून, पुणे-मुंबई जुन्या महामार्गालगत आहे. त्यामुळे नागरिकांना अधिक सोईची ठरणार आहे. या जागा बदलास आयुक्तांनी २७ ऑगस्ट २०२३ ला मान्यता दिली आहे. त्यानुसार अर्थसंकल्पात नव्या लेखाशिर्षासह ३५ कोटीची तरतूद करण्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सर्वसाधारण सभेची प्रशासकीय मान्यता दिली आहे.

















