न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ नोव्हेंबर २०२३) :- भारतीय युवक काँग्रेसकडून ‘यंग इंडिया के बोल’ या उपक्रमामध्ये विशेष प्रावीण्य मिळविल्याबद्दल पिंपरी-चिंचवड शहरातील युवक काँग्रेसचे गौरव चौधरी यांची काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्तापदी निवड करण्यात आली आहे. त्यांना युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास यांनी नियुक्तिपत्र दिले आहे.
भारतीय युवा काँग्रेसकडून यंग इंडिया के बोल हा उपक्रम जिल्हा, राज्य, राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येतो. यामधून पक्ष संघटनेसाठी विविध पातळ्यांवर प्रवक्ता नेमण्याचा उद्देश आहे. उत्कृष्ट वक्तृत्वामुळे जिल्हा आणि राज्यस्तरावर गौरव हे प्रथम आले.
त्यानंतर बेंगळुरू येथे झालेल्या युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात प्रभावीपणे मुद्दे मांडले. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय पातळीवर चांगल्या पद्धतीने केल्याने चौधरी यांची राष्ट्रीय प्रवक्तापदी निवड झाली आहे.