न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ एप्रिल) :- मावळ लोकसभा मतदारंसघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ पवार आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांची उद्या शनिवार (दि. १३) रोजी निगडीतील नियोजित महापौर निवास येथील मैदानावर जाहीर सभा होणार आहे.
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी मावळमधून राजकीय कारकीर्दीस प्रारंभ केला आहे. त्यांना महायुतीचे तगडे व मुरब्बी उमेदवार बारणे यांच्याशी लढत द्यावी लागणार आहे.
तर दुसरीकडे, पुणे जिल्ह्यातील शिरुर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीने शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना टक्कर देण्यासाठी थेट अभिनेते अमोल कोल्हे यांना रिंगणात उतरवले आहे. मावळमधून पार्थ पवार आणि शिरुरमधून अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीचे उमेदवार असल्याने दोन्ही ठिकाणच्या लढती रंगतदार होणार आहेत.











