न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ नोव्हेंबर २०२३) :- प्राप्तीकर विभागाने पिंपरी-चिंचवडमधील तीन बांधकाम व्यावसायिकांच्या घरावर आणि कार्यालयावर गुरुवारी (दि. २३) छापे मारले. नेमकी कोणत्या प्रकरणात कारवाई झाली, याची अधिकृत माहिती समजू शकली नाही.
मात्र, या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे. आपल्यावरही अशी कारवाई होऊ शकते, अशी चर्चा शहरातील इतर बड्या बांधकाम व्यावसायिक व उद्योजकांध्येही सुरू झाली.
बांधकाम व्यावसायिकाच्या पिंपरी येथील घरी गुरुवारी सकाळी प्राप्तीकर विभागाची वाहने दाखल झाली. अधिकाऱ्यांनी घराची झडती घेत तपासाला सुरुवात केली. दरम्यान, त्याच वेळी त्या बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात देखील प्राप्तीकर विभागाचे पथक दाखल झाले. त्याचबरोबर प्राप्तीकर विभागाने गुरुवारी वाकड आणि किवळे येथील बांधकाम व्यावसायिकांवर देखील कारवाई केली. यामध्ये प्राप्तीकर विभाग कोणत्या प्रकरणाची चौकशी करत आहे, याबाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही.












