न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ डिसेंबर २०२३) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रकल्प व विकासकामांवर नियंत्रण ठेवून सल्ला देणाऱ्या पॅलेडियम कन्सल्टंट इंडिया प्रा. लि. या खासगी एजन्सीला थेट दुसऱ्यांदा एक वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. बारा महिन्यांसाठी २ कोटी ९० लाख इतका म्हणजे दरमहा २५ लाखांचा खर्च महापालिका करणार आहे. या खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची बुधवारी (दि.६) मंजुरी दिली.
महापालिकेच्या स्थापत्य, पाणीपुरवठा, विद्युत, ड्रेनेज विभागांची विकासकामे व प्रकल्पांना गती देण्यासाठी महापालिकेने सिटी ट्रान्सफॉर्मेशन ऑफिसची (सीटीओ) निर्मिती केली आहे. त्याचे कामकाज पॅलेडियम कन्सल्टंट ही एजन्सी पाहत आहे. महापालिकेत सीटीओची स्थापना सन २०१७ ला तत्कालिन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी केली. त्या एजन्सीची दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली. ती एजन्सी महापालिका भवनातच काम करते. त्यानंतर आणखी एक वर्ष त्या एजन्सीला वाढवून देण्यात आले.
मुदत संपल्याने या कामासाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून निविदा काढण्यात आली. त्यातही हे काम याच एजन्सीला बहाल करण्यात आले. लघुत्तम दर असल्याने या एजन्सीची नियुक्ती करण्यात आली. एक नोव्हेंबर २०२१ पासून पुढील १ वर्षासाठी एजन्सीची नेमणूक करण्यात आली. निविदाप्रक्रिया न राबविता या एजन्सीला १ नोव्हेंबर २०२२ पासून एका वर्षाची मुदतवाढ देण्यात आली.
एजन्सीची मुदतवाढ ३१ ऑक्टोबर २०२२ ला संपली. त्यामुळे १ नोव्हेंबर २०२३ पासून थेट दूसरी मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव माहिती व तंत्रज्ञान विभागाने स्थायी समितीसमोर ठेवला होता. त्याच एजन्सीला पुन्हा एका वर्षाची दुसरी मुदतवाढ देण्यास आयुक्त तथा प्रशासक सिंह यांनी आज स्थायी समितीची मान्यता दिली आहे. एका वर्षासाठी महापालिका त्या एजन्सीला २ कोटी ९० लाख रुपये शुल्क देणार आहे. दरमहा २५ लाखांचा खर्च महापालिका करणार आहे. ही एजन्सी ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत महापालिकेला सल्ला देणार आहे.












