न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ डिसेंबर २०२३) :- अपघातानंतर जप्त केलेले वाहने परत करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच मागणाऱ्या सहायक पोलीस फौजदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले.
चिखली पोलीस ठाण्यात पहाटे एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली. नरेंद्र राजे (वय ५४) असे लाचखोर सहायक फौजदाराचे नाव आहे. राजे हे चिखली पोलीस ठाण्यात नियुक्तीस आहे. याबाबत एका तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
तरुणाच्या गाडीचा अपघात झाला होता. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. अपघातानंतर जप्त केलेले वाहन तरुणाला परत देण्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीत तरुणाने एक लाख रुपये देण्याचे मान्य केले होते. त्यापैकी १३ डिसेंबर रोजी १५ हजार रुपये व १५ डिसेंबर रोजी ५५ हजार रुपये राजे यांनी घेतलेले आहेत. रविवारी उरलेल्या रक्कमेची मागणी करून २० हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.