- भोसरी आगारामध्ये कर्मचाऱ्यांना खेळाची सुविधा उपलब्ध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ डिसेंबर २०२३) :- पीएमपी’च्या चालक- वाहकांवरील कामाचा ताण लक्षात घेता त्यांचे मानसिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी प्रशासनाने पुढचे पाऊल टाकले आहे. भोसरी आगारामध्ये कर्मचाऱ्यांना खेळाची सुविधा उपलब्ध करून देत कामाच्या ताणामधून कर्मचारी बाहेर पडतील, असा प्रयत्न केला आहे.
पीएमपी’च्या भोसरी आगारामध्ये व्हॉलीबॉलचे मैदान तयार केले. प्रशासनामार्फत सर्व साहित्य उपलब्ध करून देण्यात आले. कर्मचारी आता आगारामध्ये वेळ मिळेल त्याप्रमाणे व्हॉलीबॉलचे प्रशिक्षण घेणार असून खेळाचा आनंद लुटणार आहेत.
भोसरी आगारातील व्हॉलीबॉल मैदानाचे उद्घाटन राष्ट्रीय खेळाडू भास्कर दहातोंडे, ज्ञानेश्वर पवळे, आगार व्यवस्थापक विजयकुमार मदगे यांच्या हस्ते करण्यात आले.
पीएमपी चालक आणि वाहकांना कर्तव्यावर कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते. हजारो प्रवाशांना, मार्गावरील अडचणींना तोंड देत काम पार पाडावे लागते. प्रवाशांना सुखरूप पोहोचवावे लागते. हे काम करताना ताण येतो. तो कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना खेळाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. खेळातून मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहते, अशी माहिती भोसरी आगार व्यवस्थापक विजयकुमार मदगे यांनी दिली.











