- नगरसेवक शत्रुघ्न काटे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ डिसेंबर २०२३) :- प्रभाग क्र. २८ मध्ये असलेल्या HCMTR जागेत कोकणे चौक ते स्वराज चौक दरम्यान २ किमी लांब असे शिव छत्रपती लिनिअर अर्बन गार्डन तसेच विविध प्लाझा विकसित करण्यात आला आहे. याच शिव छत्रपती लिनिअर अर्बन गार्डन दरम्यान पी के चौक ते गोविंद यशदा चौक दरम्यान असलेल्या ४६३ मी. लांब क्षेत्रापैकी ९५ टक्के पालिकेच्या जागा ताब्यात असूनही अद्याप विकसित करण्यात आलेली नाही.
स्मार्ट सिटी अंतर्गत त्या जागेत महापालिका BMX पार्क विकसित करणार होती. परंतु या BMX पार्कचा फारसा वापर या प्रभागात होणार नसल्याचे दिसून आले. शहरात इतर दुसऱ्या ठिकाणी BMX पार्क विकसित करण्याचा विचार महापालिका करू शकते. सदर जागा समतल प्रकारची असून याचा संपूर्ण उपयोग बहुउद्देशीय मैदान विकसित करण्यासाठी केल्यास नागरिकांना याचा नक्कीच फायदा होईल, असे मत नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी व्यक्त केले.
नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी आज गुरुवारी (दि. २८) रोजी पालिका आयुक्त शेखर सिंह यांना भेटून लेखी निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे कि, ”पिंपळे सौदागर परिसरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या नागरी लोकवस्तीचा विचार करता नागरीकांच्या सुखसुविधेच्या उपाययोजना करणे क्रमप्राप्त ठरते. अश्या परिस्थितीत सदर जागेचा उपयोग महापालिका बहुउद्देशीय टर्फचे मैदान किंवा ट्रीमिक्स पद्धतीने मैदाने विकसित करण्यासाठी करू शकते. जेणेकरून याचा लाभ परिसरातील नागरिकांना घेता येईल. यासाठी विविध सुखसुविधा असलेले बहुउद्देशीय मैदान विकसित करण्यासाठी चांगल्या आर्किटेक्टची नेमणूक करण्यात यावी. जेणेकरून सदर जागेचा पूर्ण नियोजन बद्ध आराखडा तयार करून एक बहुउद्देशीय मैदान नागरिकांसाठी विकसित करता येईल. पी के चौक ते गोविंद यशदा चौक दरम्यान असलेली HCMTR च्या मोकळ्या जागेत बहुउद्देशीय मैदान विकसित करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात”, असे या निवेदनात नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी म्हटले आहे.













