- ई-रजिस्ट्रेशनसाठी अपॉईंटमेंट निश्चित करा – पीएमआरडीए…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ डिसेंबर २०२३) :- पीएमआरडीएच्या वतीने वाल्हेकरवाडी येथे एकूण ७९२ सदनिकांचा गृहप्रकल्प साकारला आहे. त्यातील १२ सदनिका अतिक्रमणधारकांसाठी राखीव ठेवल्या आहेत. या गृहप्रकल्पासाठी (पेठ क्रमांक ३० व ३२) दस्त नोंदणीला (ई-रजिस्ट्रेशन) मंगळवारपासून (दि. २६) सुरुवात झाली. पूर्ण रकम भरणाऱ्या लाभार्थ्यांना शुक्रवारपासून (दि. २९) घरांचा ताबा देण्यास सुरुवात होणार आहे.
पीएमआरडीएकडून वाल्हेकरवाडी येथील परवडणारी घरे योजनेंतर्गत ईडब्ल्यूएस व एलआयजी गटातील सदनिकांची सोडत पद्धतीने विक्री करण्यात आलेली आहे. त्यांच्या समवेत आर्टिकल ऑफ अॅग्रीमेंट (दस्त नोंदणी) करण्याची प्रक्रिया ई नोंदणी पद्धतीने सुरू करण्यात आली आहे. पीएमआरडीएकडून ७८० सदनिकांसाठी सोडत काढण्यात आली होती. मात्र, त्यातील ४० जणांनी सदनिकांसाठी अंशतः रक्कम भरली आहे. तर, २९ लाभार्थ्यांनी सदनिकांची १० टक्के रक्कम भरली आहे. तर, ४२ जणांनी पूर्ण रकम भरली आहे. ४ लाभार्थ्यांनी नोंदणीसाठी आवश्यक सर्व शुल्क अदा करुन अपाँईटमेट निश्चित केली आहे. दरम्यान, इमारत क्रमांक ११६ ए, विंग ४८ मधील फ्लॅट क्रमांक २०१ मधील पात्र सदनिकाधारक यांच्या दस्त नोंदणीची प्रक्रिया बुधवारी (दि. २७) पूर्ण करण्यात आली.
राखीव प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र नोंदणीपूर्वी सादर करणे अनिवार्य आहे. आवश्यक शुल्क भरल्यानंतर लाभार्थी नागरिकांना ई-रजिस्ट्रेशनसाठी अपॉइंटमेंट निश्चित करता येणार आहे. नोंदणीसाठी लाभार्थी व सह- लाभार्थी या दोघांनीही हजर राहून त्यांनी दोघांचेही मूळ पुरावे आणणे बंधनकारक आहे. आधारकार्ड, पॅनकार्ड, ओटीपोसाठी आधारकार्डला लिंक असणारा मोबाईल हँडसेट सोबत असणे गरजेचे आहे. दस्त नोंदणीनंतर ताबा देण्याची कार्यवाही शुक्रवारपासून (दि. २९) करण्यात येणार आहे. तरी, लाभार्थ्यांनी ई-रजिस्ट्रेशनसाठी अपॉईंटमेंट निश्चित करून घ्यावी, असे आवाहन पीएमआरडीए प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


















