- प्रशासन अपमानित करीत असल्याचा स्थानिकांचा आरोप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू वार्ताहर (दि. २९ डिसेंबर २०२३) :- देहू नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने गुरुवार (दि. २८) पासून मिळकतकर थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल वाजवून मिळकतकर थकबाकीदारांकडून करवसुली करण्यात येत आहे. वॉड क्रमांक एक, दोन व तीनमध्ये ढोल वाजविल्यानंतर एका दिवसात सुमारे २२ लाखांची वसूली झाली. तसेच तीन नळजोडही कापण्यात आले
देह नगरपंचायतीच्या हद्दीतील मिळकत करधारकांची सुमारे साडेतेरा कोटी रुपये इतकी थकबाकी आहे. त्यापैकी फक्त पावणेतीन कोटी रुपये वसूल करण्यात नगरपंचायत यशस्वी झाली आहे. सुमारे पावणे अकरा कोटी रुपये थकबाकी आहे. थकबाकीदारांनी मिळकतकर भरण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने वेळोवेळी दवंडी पिटवून, सूचना, नोटीस देणे अशा मार्गाचा अवलंब करून नागरिकांना कर भरण्यासाठी वारंवार आवाहन करण्यात आले आहे. थकबाकीधारकांची मालमत्ता जप्त करून कर वसुली करण्यात येणार असल्याचे नगरपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे मिळकत करधारकांनी वसुलीसाठी पथक येण्यापूर्वी आणि मालमत्ता जप्तीपूर्वी मिळकत कर भरावा, असे आवाहन करण्यात नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी निवेदिता घार्गे व करसंकलन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर शिंदे यांनी केले आहे.
मिळकतकराचे पैसे भरण्यासाठी काही नागरिकांच्या खरोखरच अडचणी असतात, अशा नागरिकांच्या घरासमोर ढोल वाजवून प्रशासन त्यांना अपमानित करीत असल्याचे आरोप नागरिकांनी केला. ढोल वाजविण्याचा प्रकार त्वरीत थांबवावा, अशी मागणीही त्यांनी केली.













