- आयोजकांसह मान्यवरांकडून मुख्य सभामंडपाची पाहणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ जानेवारी २०२४) :- शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. चिंचवडगाव येथील श्री मोरया गोसावी क्रीडा संकुलावर ६ व ७ जानेवारी २०२४ दरम्यान या नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून येथील मुख्य सभामंडपाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.
नाट्य संमेलनाचे आयोजक, अ. भा. मराठी नाट्य पिंपरी चिंचवड शाखेचे भाऊसाहेब भोईर, डॉ. पाटील विद्यापीठाचे डी. वाय. कुलपती डॉ. पी. डी. पाटील, अखिल मराठी नाट्य परिषदेच्या -चिंचवड शाखेचे कार्याध्यक्ष राजेशकुमार साकला व कृष्णकुमार गोयल, उद्योजक राजेंद्र जैन, उपायुक्त क्रीडा विभाग पिं चिं महानगर पालिकाचे मिनिनाथ दंडवते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहायक विकास पाटील, नाटय संमेलनाचे मुख्य नेपथ्यकर श्याम भुतकर, सुदाम परब, संतोष पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी मुख्य सभामंडपाची पाहाणी करून तयारीचा आढावा घेतला.
मुख्य सभामंडपाच्या तयारी विषयी माहिती देताना नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर म्हणाले की, संपूर्ण मैदानावर तब्बल ६५ हजार स्केअर फुटांचा मांडव नाट्य संमेलनासाठी घालण्यात आला असून यामध्ये ५ हजार रसिक प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. नाट्य संमेलनात दोन दिवसांत भरगच्च कार्यक्रम असल्याने कलाकारांच्या सोईसाठी ५ ग्रीन रूम, एक वातानुकूलीत व्हीआयपी रूम तयार करण्यात आली आहे. तसेच सभा मंडपात एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहेत. मुख्य सभामंडपाला ‘सूर्यमाला सभामंडप’ असे नाव देण्यात आले असून रंगमंचाला ‘आद्यनाटककार कै विष्णुदास भावे रंगमंच’ असे नाव देण्यात आले आहे. तर प्रवेशद्वाराला पै क्रांतिवीर चाफेकर बंधू प्रवेशद्वार व महान साधू मोरया गोसावी प्रवेशद्वार अशी नावे देण्यात आली आहेत.
डॉ. पी. डी. पाटील म्हणाले की, प्रत्येक कामासाठी योग्य व्यक्तींची निवड केली आहे. मुख्य सभामंडपात आजवर झालेल्या ९९ नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांचे फोटो लावण्यात आले आहेत. १०० वे नाट्य संमेलन ऐतिहासिक ठरेल याविषयी काही शंका नाही.















