न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू वार्ताहर (दि. ०८ जानेवारी २०२३) :- देहू नगरपंचायत प्रशासनाने सहा दिवसांमध्ये सुमारे एक कोटी साठ लाख रुपयांचे मिळकत कर वसूल केल्याची माहिती नगरपंचायतीचे कर अधीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांनी दिली आहे.
देह नगरपंचायतीचे मिळकत कर सुमारे १३ कोटी रुपये थकबाकी आहे. नागरिकांना वारंवार कर भरण्यासंदर्भात नोटीस बजावून आवाहन करण्यात आले होते. कर न भरणाऱ्यानां नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानंतरही कर न भरणाऱ्याच्या घरासमोर ढोल ताशा वाजविण्याच्या तसेच त्यानंतर चौका चौकांमध्ये फलक उभारणे, वृत्तपत्रांमध्ये संबंधित थकबाकीधारकांची नावे प्रसिद्ध करणे आणि त्यानंतरही कर न भरणाऱ्या करदात्यांच्या मालमत्तेची जप्ती करणे, अशा संदर्भातील सूचनाही बजावण्यात आल्या आहेत. मात्र, दसरा दिवाळी सणानिमित्त वेळ देऊनही कर न भरणाऱ्यांच्या घरासमोर वसुली पथकाद्वारे ढोल ताशा बजावण्यात येत आहेत.
सुमारे साडेचारशे करदात्यांना जप्तीच्या नोटीसही बजावण्यात आल्या असून लवकरच पुढील कारवाई करण्यात येणार आहे. मुख्याधिकारी निवेदिता घार्गे यांच्या मार्गदर्शनात प्रशासनाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने ही वसुली झाल्याची माहिती कर संकलनाचे शिंदे यांनी दिली आहे.
सुट्टीचे दिवस वगळता सहा दिवसांमध्ये सुमारे एक कोटी साठ लाख रुपये वसूली झाली आहे. त्यामुळे पूर्वी जमा झालेली एक कोटी ९० लाख आणि सहा दिवसात जमा झालेले एक कोटी साठ लाख यामुळे वसुली सुमारे साडेतीन कोटी वर गेली आहे.