- स्मार्ट सिटीतील अधिकारी हवालदिल; २१ दिवसांपासून लीकेजच सापडेना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जानेवारी २०२३) :- महापालिकेकडून पाणीपुरवठ्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जात असतानाही नागरिकांना ड्रेनेज मिश्रित पाणी प्यावे लागत असल्याचे चित्र आहे. मोशीतील संतनगर सेक्टर नंबर चार परिसरात मागील तीन आठवड्यांपासून ड्रेनेजचे पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळत आहे. अतिशय दूषित, अळ्या असलेले पाणी येत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दुर्दैव म्हणजे स्मार्ट सिटीतील अधिकाऱ्यांना २१ दिवसांपासून लीकेज सापडत नाही.
मोशी परिसर दाट लोकवस्तीचा आहे. या भागात मोठमोठ्या गृहनिर्माण संस्था विकसित झाल्या आहेत. महापालिका चिखली आणि निगडीतील जलशुद्धीकरणातून शहरवासीयांना पाणीपुरवठा करते. या भागात सातत्याने विस्कळीत पाणीपुरवठा राहतो. संतनगर सेक्टर नंबर ४ केंद्रीय विहाराशेजारी शिवगंगा सिद्धी अपार्टमेंटसह विविध सोसायट्या आहेत. या परिसरात होणाऱ्या पिण्याच्या पाणीपुरवठ्यात गेल्या तीन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीपासून ड्रेनेजचे पाणी मिक्स होत आहे. पाण्यात अळ्या येत आहेत. हे पाणी वापरण्यात आल्याने लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिक यांना घसा, उलट्या तसेच जुलाबाचा त्रास होत आहे.
माजी नगरसेवक विलास मडिगेरी यांनी दखल घेऊन पाइपलाईन वॉश आउट केली. तसेच नवीन चेंबर तयार करून उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला. परंतु अजूनही प्रश्न सुटलेला नाही. महापालिकेच्या वतीने जेसीबी पाठवून रस्त्यावर आठ ते दहा ठिकाणी खोदकाम करण्यात आले. परंतु, तीन आठवड्यानंतरही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी येतात, खोदतात आणि लीकेज सापडत नाही अशी परिस्थिती आहे.