- पीएमआरडीएचा महत्वकांक्षी प्रकल्प…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जानेवारी २०२३) :- लोणावळ्याजवळील कुरवंडे परिसरातील टायगर, लायन्स पॉइंट पर्यटनस्थळ विकासाच्या ३३३ कोटी ५६ लाख रुपयांच्या प्रस्तावाला उच्चाधिकार समितीने नुकतीच मान्यता दिली, त्यामुळे या ठिकाणी दोन्ही पॉइंट जोडणारा दरी पूल, साहसी खेळांचा विकास, लाइट अँड साउंड शो अशा सुविधांनी युक्त पर्यटनस्थळाच्या विकासाला गती मिळणार आहे. हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ साकारण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. या प्रकल्पाची जबाबदारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) सोपविण्यात आली आहे.
लोणावळ्याजवळील कुरवंडे गावाजवळ टायगर आणि लायन्स पर्यटनस्थळांच्या विकासासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून वनविभागामार्फत गेल्या दोन ते तीन वर्षांपासून आराखडा तयार करण्यात येत होता. या प्रकल्पाची जबाबदारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) सोपविण्यात आली आहे. पीएमआरडीएने या पर्यटनस्थळ विकासाच्या दृष्टीने विकास आराखडा तयार केला व जिल्हास्तरीय समितीची मान्यता घेतली, त्यानंतर हा प्रस्ताव राज्य सरकारच्या उच्चाधिकार समितीकडे पाठविण्यात आला. उच्चाधिकार समितीच्या बैठकीत या ३३३ कोटी ५६ लाख रुपयांच्या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यामुळे लोणावळ्याजवळ जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ विकसित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
लायन्स आणि टायगर पॉइंटला दर शनिवारी, रविवारी सुमारे दहा हजार तर दररोज दोन ते तीन हजार पर्यटक भेट देतात. या परिसराच्या विकासासाठी किमान १५ हेक्टर एवढी जमीन रस्त्यासहित उपलब्ध होण्याची गरज आहे. पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सप्टेंबरमध्ये बैठक घेतली. या ठिकाणी अरुंद रस्ते, उपाहारगृह, पाणी सुविधा, वाहनतळ, विद्युत व्यवस्था, माहिती फलक, शौचालय सुविधा तसेच घनकचरा व्यवस्थापन या सुविधांचा अभाव आहे. त्यामुळेच पवार यांनी प्रस्तावित कामांचा विकास आराखडा तयार करण्यासाठी पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल यांना सूचना दिल्या होत्या.
टायगर पॉइंटची प्रस्तावित कामे…
ग्लास स्काय वॉक – १२५ मी लांब ६ मी रोड
अॅम्फी थिएटर- १००० व्यक्तीसाठी
लाइट अँड साउंड शो
लहान मुलांची खेळण्याची जागा
प्रवेशद्वार व तिकीट घर
रस्ता रुंदीकरण ४५ मी.
वाहनतळ एकूण १५००
कार व दोन हजार स्कूटर
गझिबो २० चौ. मी. (एकूण २४)
साहसी खेळ
झिप लाइन – ९२५ मी. लांब
बंजी जम्पिंग
वॉल क्लाइंचिग
फेरीस व्हील