न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १० जानेवारी २०२४) :- देशातील सर्व रेशन दुकानदार उद्या गुरुवार (दि. ११) रोजी विविध प्रलंबित मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलनात सहभागी होणार आहेत. देशपातळीवरील नवी दिल्लीतील ऑल इंडिया फेअर शॉप डिलर्स फेडरेशन आणि ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपकिपर्स फेडरेशनच्या वतीने हे धरणे आंदोलन दिल्लीस्थित जंतरमंतरवर होणार आहे.
फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डी. सी. कटारिया आणि राष्ट्रीय प्रधान महासचिव देवन रजक यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील आणि देशातील रेशन दुकानदार या धरणे आंदोलनात सहभागी होणार आहेत.
याबाबत माहिती देताना खजिनदार विजय गुप्ता म्हणाले, रेशन दुकानदारांच्या प्रलंबित न्याय हक्क मागण्यांसंदर्भात केंद्र आणि राज्य सरकार उदासीन आहे. सरकारकडून दखल घेतली जात नाही. सरकारकडून कोणताही निर्णय होत नाही. त्यामुळे फेडरेशनच्या वतीने हे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले आहे. ज्यात भारतातील सर्व सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील विक्रेत्यांना किंवा त्यांच्या नामनिर्देशित व्यक्तींना सरकारी नोकर म्हणून घोषित करावे. किंवा पंचावन्न हजार रुपये मासिक मानधन निश्चित करावे. यातही काही घटनात्मक अडथळा असल्यास, केंद्रीय वाधवा समितीने शिफारस केलेल्या ४६० रुपये प्रती क्विंटल कमिशन द्यावे. या मागण्यांचा समावेश फेब्रुवारी २०२४ मध्ये होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पात निश्चित करावा. याशिवाय आठ प्रलंबित मागण्यांच्या समर्थनार्थ हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात राज्यासह देशातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे. या धरणे आंदोलनाची केंद्र सरकारने योग्य ती दखल न घेतल्यास एप्रिल महिन्यात नाईलाजास्तव संपावर जाण्याचा निर्णय फेडरेशनच्या वतीने घेण्यात येईल, याला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार राहील, असा इशारा गुप्ता यांनी दिला आहे.