न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० जानेवारी २०२४) :- तळेगाव – चाकण – शिक्रापूर ५४८-डी या राष्ट्रीय महामार्गासह पुणे ते शिरूर आणि नाशिक फाटा ते खेड या तीन उन्नत महामार्गांच्या निविदा पटलावर झळकल्या आहेत. त्यामुळे काम लवकरच सुरू होण्याच्या आशेने तळेगाव – चाकण – शिक्रापूर महामार्गालगतच्या नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पाच वर्षांपूर्वी तळेगाव – चाकण शिक्रापूर रस्ता ५४८ डी हा राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आला. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने त्रयस्थ सल्लागार संस्थेमार्फत महामार्गाचे सर्वेक्षण करून विस्तृत प्रकल्प अहवाल मंजुरीसाठी सादर केला होता. अस्तित्त्वातील तळेगाव – चाकण टप्प्यातील २५ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे बांधा, वापरा हस्तांतरित करा, या तत्त्वावर चौपदरीकरण करून त्यावर चौपदरी उड्डाणपूल बांधण्याच्या कामाची २,४५५.७८ कोटी रुपयांची निविदा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने प्रसिद्ध केली आहे. तसेच चाकण ते शिक्रापूर टप्प्यातील २८ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे चौपदरीकरण करून त्यावर चौपदरी उड्डाणपूल बांधण्याच्या कामाची २,७७८.५३ कोटी रुपयांची निविदा प्राधिकरणाने प्रसिद्ध केली आहे.
प्रकल्पाची निविदा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या वेबसाइटवर २१ डिसेंबर २०२३ रोजी प्रकाशित करण्यात आली आहे. त्यानंतर रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या ठरलेल्या मानक कार्य पद्धतीनुसार पात्र कंत्राटदारास प्रकल्पाचा कार्यादेश प्रदान करण्यात येईल.
– अनिकेत यादव, तांत्रिक प्रशासक, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे…