न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जानेवारी २०२४) :- गुंठेवारी कायद्यानुसार बांधकामे नियमित करण्यासाठी पीएमआरडीएच्या विकास परवानगी विभागाकडे नागरिकांनी नोंदणीकृत आर्किटेक्ट/नोंदणीकृत इंजिनिअर्स यांच्यामार्फत ३० एप्रिलपर्यंत आकुर्डी येथील कार्यालयात प्रस्ताव दाखल करावे, असे आवाहन महानगर आयुक्त राहुल महिवाल यांनी केले आहे.
ज्या नागरिकांनी खासगी जमिनीवर ३१ डिसेंबर २०२० पुर्वी गुंठेवारी पद्धतीने बांधकामे केलेली आहे, त्यांना गुंठेवारी बांधकामे नियमित करण्यासाठी पीएमआरडीएच्या विकास परवानगी विभागाकडे नियमितीकरणाचा प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. गुंठेवारी अंतर्गत संपूर्ण अनधिकृत रेखांकन नियमितीकरण, गुंठेवारी अंतर्गत रेखांकनातील एखाद्या मोकळ्या भूखंडाचे नियमितीकरण तसेच, गुंठेवारी अंतर्गत मोकळे भूखंड व विद्यमान बांधकामांचे नियमितीकरण अशा तीन प्रकारांमध्ये गुंठेवारी पद्धतीने बांधकामे नियमित करता येणार आहेत.
आवश्यक कागदपत्रे सादर करुन ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. त्यासाठी निश्चित केलेले प्रशमन आणि विकास शुल्क आकारुन गुंठेवारी कायद्यानुसार बांधकामे नियमित केली जाणार आहेत. दिलेल्या कालावधीत पीएमआरडीएकडे अर्ज सादर न करणारे अनधिकृत बांधकाम आणि भूखंडधारकांवर नाईलाजाने महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम, २००१ चे कलम ७ अन्वये योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे महिवाल यांनी स्पष्ट केले आहे.