- कोटींची रक्कम वर्ग करून घेण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जानेवारी २०२४) :- कोविड काळामध्ये स्पर्श संस्थेने तीन कोविड केअर सेंटर उभारले होते. त्यातील दोन सेंटरमध्ये कोणत्याही सुविधा व रुग्णही नव्हते. तरीही तीन कोटी २९ लाख ४० हजार रुपयांचे बील महापालिकेकडे सादर करून रक्कम घेतले होती. या प्रकरणाची चौकशी सुरू होती. त्यात सत्यता आढळल्याने ही रक्कम वसूल करण्याचा आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिला आहे. त्यानुसार स्पर्शने ऑटो क्लस्टरमध्ये उभारलेल्या कोविड केअर सेंटरचे प्रलंबित बिल व अनामत रकमेतून सदर रक्कम वर्ग करून घेण्यात येणार आहे.
कोरोनाच्या कालावधीत रुग्णांना जलद आणि चांगली सुविधा उपलब्ध व्हावी व रुग्णांना क्वारंटाइन करण्यासाठी कोविड सेंटरची उभारणी खासगी भागीदारामार्फत करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यात स्पर्श हॉस्पिटलचाही समावेश होता. त्यांनी ऑटो क्लस्टरसह भोसरीतील रामस्मृती मंगल कार्यालय आणि हिरा लॉन्स या दोन ठिकाणी प्रत्येकी तीनशे खाटांचे कोविड केअर सेंटर उभारले होते. मात्र, स्पर्शने संबंधित ठिकाणी कोणतीही सुविधा दिलेली नव्हती.
हॉस्पिटलचे ‘सीईओ’ अमोल होळकुंडे यांनी मात्र सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याचे पत्र महापालिकेला दिले होते. त्याबाबत तक्रार आल्यानंतर तत्कालीन आयुक्तांच्या आदेशानुसार वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पाच आक्टोबर २०२० रोजी संबंधित सेंटरची पाहणी केली. त्या वेळी रुग्णांसाठीच्या सुविधा उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले होते. शिवाय, रुग्ण कमी झाल्यामुळे बहुतांश कोविड सेंटर १५ सप्टेंबरच्या आदेशाद्वारे बंद केली होती. असे असतानाही एक ऑगस्ट ते ३० आक्टोबर २०२० या कालावधीचे बिल स्पर्शने सादर केले होते. तेव्हा तत्कालीन अतिरिक्त आयुक्तांनी आयुक्तांची परवानगी न घेता स्पर्शला तीन कोटी २९ लाख ४० हजार रुपये देण्याचा आदेश दिला होता. त्यापैकी अनामत वजा करून तीन कोटी १४ लाख एक हजार ९०० रुपये दिले होते. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी होऊन उच्च न्यायालयाने महापालिका आयुक्तांना चौकशी करून निर्णय घेण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार चौकशी केल्यानंतर सत्यता आढळली आहे. त्यामुळे ती रक्कम वसूल करण्याचा आदेश आयुक्तांनी दिला आहे.
महापालिकेमार्फत रामस्मृती मंगल कार्यालय व हिरा लॉन्स येथील कोविड केअर सेंटरसाठी स्पर्श हॉस्पिटलला तीन कोटी २९ लाख ४० हजार रुपये दिले होते. ते ऑटो क्लस्टर कोविड केअर सेंटरच्या प्रलंबित बिलामधून तसेच, अनामत रकमेपोटी स्पर्शने महापालिकेकडे जमा केलेल्या रकमेमधून कपात करावेत. उर्वरित रक्कम संबंधित संस्थेस द्यावी, असा आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिला आहे.

















