- निविदा प्रक्रिया न राबविताच त्या संस्थाना मुदतवाढ…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ जानेवारी २०२४) :- पिंपरी-चिंचवड शहरात घरोघरचा ओला व सुका कचरा वेगवेगळा जमा करण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. त्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने तीन संस्थांची एका वर्षासाठी नेमणूक केली. त्यानंतर निविदा प्रक्रिया न राबविता त्या संस्थांना एक वर्षाची मुदतवाढ दिली. आता पुन्हा तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासाठी तब्बल ५ कोटी ३७ लाख ८४ हजार ८८८ रुपयांचा खर्च होणार आहे.
इंदोर शहराच्या धर्तीवर महापालिकेने ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्यासाठी विविध संस्थांची नेमणूक केली होती. या संस्थांचे कर्मचारी नागरिकांमध्ये ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्याबाबत जनजागृती करतात, असा महापालिकेचा दावा आहे. त्यासाठी इंदूर येथील बेसिक्स म्युनिसिपल वेस्ट व्हेंचर्स लि. या एजन्सीला अ, ड, ई आणि ह या एकूण चार क्षेत्रीय कार्यालयांचे काम देण्यात आले आहे.
डिव्हाइन मॅनेजमेंट अॅण्ड सर्व्हिसेसला ब, क आणि ग या तीन क्षेत्रीय कार्यालयांचे काम आहे. जनवानीकडे फ क्षेत्रीय कार्यालयाचे काम आहे. या कामासाठी निविदा प्रक्रिया राबवून या तीन संस्थांना एका वर्षासाठी नेमण्यात आले होते. त्या संस्थांची एका वर्षाची मुदत संपली. मात्र, आरोग्य विभागाने निविदा प्रक्रिया न राबवता त्या तीन संस्थांना थेट एका वर्षाची मुदतवाढ दिली. त्यानंतरही महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविली नाही. त्यामुळे या तीन संस्थांना १ नोव्हेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ अशी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यासाठी तब्बल ५ कोटी ३७ लाख ८४ हजार ८८८ रुपये खर्च होणार आहे. मुदतवाढीसह या खर्चास आयुक्त शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे.














