- दरवर्षी तब्बल पाचशे कोटींचे उत्पन्न मिळणार; महापालिकेचा दावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जानेवारी २०२४) :- सिंगापूर व दुबईच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील सायन्स पार्कसमोरील २६ एकर जागेत इको फ्रेंडली व नावीन्यपूर्ण रचना असलेले सिटी सेंटर (व्यापारी संकुल) साकारण्यात येणार आहे.
सार्वजनिक खासगी सहभाग (पीपीपी) तत्त्वावर हा तब्बल २ ते ३ हजार कोटी खर्चाचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीत दरवर्षी तब्बल ५०० कोटी रुपये जमा होणार आहेत, असा दावा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
सिटी सेंटर प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडला आहे, प्रशासकीय राजवटीत या प्रकल्पास गती आली आहे. त्यासाठी महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, तत्कालीन अतिरिक्त आयुक्त आणि शहर अभियंता मकरंद निकम यांनी दुबईचा दौरा केला. तर, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, स्थापत्य प्रकल्प विभागाचे सहशहर अभियंता प्रमोद ओंबासे, उद्यान विभागाचे उपायुक्त रविकिरण घोडके, उपअभियंता विजय भोजने, तसेच शासनाच्या नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी शिवाजी कहाण यांनी नुकताच सिंगापुर दौरा केला. तेथील आकर्षक व पर्यावरणपूरक व्यापारी संकुलाच्या इमारतींची पाहणी करण्यात आली, त्यातील योग्य व नावीन्यपूर्ण अशा बाबी सिटी सेंटरमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत.













