न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जानेवारी २०२४) :- देशभक्तीपर गाणी, क्रिडा स्पर्धांचे जल्लोषात बक्षीस वितरण, भारतीय संविधानाबाबत माहिती देणारी भाषणे आणि भारत मातेच्या जयघोषात येथील साई पर्ल सोसायटीमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
सोसायटीतील अबालवृध्दांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडलेल्या या समारंभात सुरुवातीला लेफ्टनंट कर्नल स्वप्निल खालकर यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकवून सामुहिक राष्ट्रगीत सादर करण्यात आले. त्यानंतर श्रीकांत माने, कुशाग्र शर्मा, अमित काळंगे, अनिल कुलकर्णी, अरविंद माने, तोरल घोरी, अमृता देशमुख आणि राजेंद्र सुपे यांनी देशभक्तीपर गाणी सादर केली.
सोसायटीतील ज्येष्ठ नागरिक विलास भाले यांनी देशभक्तीपर मनोगत व्यक्त केले. वैशाली खोकराळे यांनी प्रजासत्ताक दिन आणि भारतीय संविधानाबाबत माहिती दिली. सोसायटी अंतर्गत महिला, शालेय विद्यार्थी आणि युवागटात झालेल्या क्रिकेट स्पर्धांचे ज्येष्ठ महिलांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे निवेदन मानसी रत्नपारखी यांनी केले. अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.















