- स्थापत्य विभाग दुरुस्ती करणार नाही; प्रशासक शेखर सिंह यांचा आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जानेवारी २०२४) :- शहरात भूमिगत सेवावाहिन्या टाकण्यासाठी खासगी संस्थांमार्फत खोदकाम केले जाते. मात्र, त्याच्या दुरुस्तीचे काम संबंधित संस्थेमार्फत केले जात नाही. यापुढे खोदकाम करणाऱ्या संस्थेनेच दुरुस्तीचे काम करावे लागणार आहे. त्यामुळे आता कोणत्याही प्रकारचे खोदकाम केल्यानंतर स्थापत्य विभागामार्फत त्याची दुरुस्ती केली जाणार नाही, असे आदेश प्रशासक शेखर सिंह यांनी दिले आहेत. यामुळे वारंवार दुरुस्तीसाठी निघणाऱ्या कोट्यवधींच्या निविदांना आळा बसणार आहे.
शहरातील रस्ते खोदाईचे काम करण्यासाठी रस्ता पूर्ववत करण्याची अट टाकूनच परवानगी देण्यात यावी. खोदाई केलेले रस्ते, चर बुजविण्याचे काम त्या विभागाचे कार्यकारी अभियंत्यांचे राहील. हे काम करून घेण्याची जबाबदारी कनिष्ठ अभियंता, उपअभियंता यांच्यावर असणार आहे. तसेच, बुजविलेले खड्ड्रे पुन्हा नादुरुस्त झाल्यास याची दुरूस्ती करण्याची जबाबदारी त्या-त्या कनिष्ठ अभियंता व उपभियंत्यांची राहणार आहे. रस्ते, खड्ड्यांची दुरुस्ती करण्याची तीन वर्षाची अट घालावी, यापुढे महापालिकेमार्फत रस्त्यांची खोदाई करताना संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी रस्ता दुरुस्तीसाठी आवश्यक सर्व बाबींचा अंदाजपत्रकात समावेश करावा. कामाचा हमी कालावधी पूर्ण होण्यापूर्वी रात्यांवर खड़े पडल्याम संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अशा सूचना आयुक्त यांनी केल्या आहेत.
रस्ते खोदाई महापालिकेमार्फत व बाह्य एजन्सीमार्फत करण्यात येत असते. महापालिकेमार्फत खोदाई करण्यात येत असल्यास संबंधित विभागामार्फत त्वरित रस्ते दुरुस्ती करता येते. स्थापत्य विभागाच्या समन्वयाने ही कामे करावीत, अशा सूचना आयुक्तांनी केल्या आहेत. तसेच, शहरात कोणत्याही विभागाने रस्ते खोदाई केली की यापूर्वी स्थापत्य विभागामार्फत त्याची दुरूस्ती केली जात होती. आता नवीन धोरणानुसार ज्या विभागाने खोदाई केली त्याच विभागाने रस्ते दुरुस्ती अथवा खड्डे बुजविण्याची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती शहर अभियंता मकरंद निकम यांनी दिली आहे.