- एमआयडीसी परिसरातील कामगार सावलीच्या प्रतीक्षेत – अभय भोर
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
भोसरी (दि. २० एप्रिल २०१९) :- भोसरी औद्योगिक परिसर हा समस्यांच्या गर्तेत सापडला आहे. अनेक ठिकाणी गंभीर समस्या आ-वासून उभ्या आहेत. तरीही पिंपरी-चिंचवड महापालिकेचे निर्ढावलेले प्रशासन मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यास अकार्यक्षम व कुचकामी ठरत आहे. याबाबत फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी प्रसिद्धीपत्रक काढले आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे की, भोसरी औद्योगिक परिसरात मोठ्या संख्येने कामगार वर्गाची कामासाठी रेलचेल असते. त्यामुळे या परिसरात भोसरी ते पिंपरी रस्त्यालगत बसथांबा उभारण्यात यावा, अशी मागणी बऱ्याच दिवसापासून संघटनेच्या माध्यमातून लावून धरली आहे. परंतु, त्यावर महानगरपालिकेने लक्ष केंद्रित केलेले नाही. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यातच एप्रिल व मे हे दोन महिने कडक उन्हाळ्याचे असतात.
बसथांबाच नसल्यामुळे अनेक महिला व कामगारांना रस्त्यावर उभे राहावे लागते. कधी-कधी कडक उन्हामुळे चक्कर येऊन अनेक महिला बेशुद्धही पडतात. या परिसरात पाण्याचीसुद्धा जवळपास सोय नाही. लवकरच पावसाळा सुरू होईल. कामगार वर्गाला व महिलांना उभे राहण्यासाठी कुठेही आसरा नाही. महापालिकेचे काही ठिकाणचे बसस्टॉप अशा अवस्थेत आहेत की, तिथे थांबले असता, गंभीर अपघात घडण्याचीही भीती आहे. ते कधी कोसळतील ते सांगता येत नाही. ते अत्यंत धोकादायक स्थितीमध्ये आहेत व काही ठिकाणी बसस्टॉपच्या जागी अनाधिकृत टपऱ्या बनल्या आहेत. म्हणजेच ”रोगापेक्षा इलाज भयंकर”, अशी अवस्था आहे.
मोठे वादळ-वारे आल्यानंतर बसथांब्यावरचे पत्रे खाली पडतात. त्यामुळे अनेकांना इजा होण्याची संभावना आहे. महानगरपालिकेने याकडे त्वरित लक्ष द्यावे, अन्यथा फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे निषेध सभा घेण्यात येईल, असे या पत्रात भोर यांनी म्हटले आहे.











