न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जानेवारी २०२४) :- पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने मकर संक्रांतीच्या निमित्ताने स्त्रियांसाठी हळदी कुंकू आणि पुरुषांसाठी तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कै. बाळासाहेब कुंजीर क्रीडांगणावर बुधवारी सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात पसायदानाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित महिलांना संक्रांतीचे हळदीकुंकू आणि वाण देण्यात आले तर पुरुषांना तीळगुळाच्या वड्या आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने वासंती जोशी यांनी संक्रांतीचा सण, हळदी कुंकू आणि त्यानिमित्ताने आहाराचे महत्त्व सांगितले.
दरम्यान उषा भागवत, श्यामल कात्रे, विजया तारे, सुकेशिनी कुबीटकर, शशिकांत कुलकर्णी, सुरेखा पाटील, शैलजा लोकरस यांनी विविध गाणी सादर केली. जानेवारी महिन्यातील वाढदिवस आणि ज्यांच्या लग्नाला पन्नास वर्षे पूर्ण झाली अशा ज्येष्ठांना गुलाब पुष्प देऊन यावेळी सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचलन शकुंतला शिंदे यांनी केले तर विवेकानंद लिगाडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विलास जोशी तसेच अनिल कुलकर्णी, श्रीकृष्ण निलेगावकर, सखाराम ढाकणे, बाळकृष्ण चौधरी, जयपाल शिधनाळे, रमेश भट, तारकेश गोडबोले आदिंनी परिश्रम घेतले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.











