न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जानेवारी २०२४) :- पुणे-लोणावळा लोकल सेवा आता दुपारच्या वेळेतही सुरू राहणार आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या दुपारच्या लोकलला बुधवारी हिरवा झेंडा दाखविला. यामुळे आता या मार्गावरील प्रवाशांची सोय होणार आहे.
याआधी या मार्गावर दुपारी तीन तास लोहमार्गांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी ही सेवा बंद ठेवली जात होती. शिवाजीनगर येथून दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी लोकल सोडण्यात येणार आहे.
करोनाच्या काळात रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती. त्यावेळी पुणे-लोणावळा लोकल सेवा बंद करण्यात आली होती. करोनाचे सावट संपल्यानंतर लोकल सेवा सुरू केली होती. पण, दुपारच्या टप्प्यातील लोकल सेवा बंद होती. त्यामुळे विद्यार्थी व कामाच्या निमित्ताने प्रवास करणाऱ्यांचे हाल होत होते. त्यामुळे दुपारची लोकल सेवा सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात होती.
अशी वेळ असेल दुपारच्या लोकलची…
शिवाजीनगरहून १२ वाजून पाच मिनिटांनी लोकल सुटेल. ती १२ वाजून ४५ मिनिटांनी लोणावळा येथे पोहोचेल.
लोणवाळा येथून सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी लोकल सुटेल. ती शिवाजीनगर येथे एक वाजून २० मिनिटांनी दाखल होईल.