न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ फेब्रुवारी २०२४) :- दिव्यांग बालकांसाठी ११ वे मोफत होमिओपॅथी उपचार शिबीर वाकड येथे संपन्न झाले. पिंपरी चिंचवड महानगरपालिका सी.एस.आर.विभाग, सप्तर्षी फाऊंडेशन व प्रेडिक्टीव होमिओपॅथी यांच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्मीबाई बारणे उद्यान सभागृह, वाकड येथे विशेष (दिव्यांग) मुलांकरिता ११ वे मोफत वैद्यकीय शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ७४ विशेष बालकांनी या शिबीराचा लाभ घेतला.
१२ ऑगस्ट २०२१ सदर पासून शिबिराची सुरुवात झाली होती. या शिबिराच्या माध्यमातून शेकडो दिव्यांग बालकांच्या कुटुंबाना मोठा आधार मिळाला आहे. या उपक्रमाअंतर्गत नोंदणी झालेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना मोफत कायमस्वरूपी उपचार दिले जात आहेत.
सदर शिबिराला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सी.एस.आर.विभागाच्या सल्लागार श्रुतिका मुंगी यांच्यासह सप्तर्षी फाऊंडेशनच्या वतीने रंजना सुतार, ज्योती आघारकर, संतोष कांबळे, दीपक चौधरी, श्रद्धा देशमुख, रूशाली बोरसे, अश्विन वाल्हेकर, प्रथमेश कदम, हर्षल सुरुशे, अविनाश वाल्हेकर, यांनी कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी पार पाडली. प्रेडिक्टीव होमिओपॅथी च्या वतीने डॉ.अमित पांचाल, डॉ.राकेश शुक्ला, डॉ. रजत मालोकार, डॉ.राणी गुप्ता, डॉ.प्रेषिता ओझा हे तज्ञ डॉक्टर तसेच त्यांच्या टीम मधील डॉ.शिव सिंग, डॉ.सात्विक नारायण, डॉ.तेजवीर कौर, डॉ.धवल शर्मा, डॉ.जीविका, डॉ.मुस्कान, डॉ.रुचिता, डॉ.मरियम, डॉ.प्रियंका, डॉ.नीरज. डॉ.दिव्या, डॉ.निवेदिता, डॉ.हेमंती, डॉ.साक्षी यांनी हे शिबीर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. सदर शिबिरासाठी सामाजिक कार्यकर्ते विवेक सोळंके, रंजना सुतार, संजय चौधरी, संग्राम गोरे, मंगेश सुरवसे ज्ञानेश ठाकूर या व्यक्तींचेही सहकार्य लाभले.
सदर शिबीरात “दिव्यांग बांधवांसाठी इंटिग्रेटेड वन स्टॉप सोल्युशन” या प्रकल्पांतर्गत बनविण्यात आलेल्या सॉफ्टवेरद्वारे लाभार्थ्यांचे ऑनलाइन नोंदणीकरण करण्यात आले. दिव्यांग बांधवांना विविध प्रकारच्या शासकीय व खाजगी सोई-सुविधा त्यांच्या मोबाइलमध्ये अॅपद्वारे उपलब्ध होणार असून सदर संकल्पना भारत सरकारच्या कॉपीराईट विभागाकडून मान्यताप्राप्त असून लवकरच याची पेटंट कायद्याअंतर्गत नोंदणी करण्यात येणार आहे. सदर प्रकल्पांतर्गत सर्व प्रकारच्या सर्व शासकीय स्तरावरच्या विविध योजना एका क्लिकवर उपलब्ध होणार असून विविध आरोग्य विमा योजनांची सर्व प्रकारची माहिती व क्लेम सेवा एकाच ठिकाणाहून मिळणार असल्याने दिव्यांग बांधवांचे श्रमात आणि वेळेत बचत होणार आहे. यासोबतच सर्व प्रकारच्या दिव्यांग शिबिरांची माहिती तसेच दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व संस्था, व्यक्ती, वैद्यकीय सेवा देणाऱ्या संस्था इत्यादी सर्व माहिती एका क्लिकवर मोबाइल मध्ये उपलब्ध होणार आहे, यामुळे लाभार्थी तसेच दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था व व्यक्ती यांना त्यांच्या हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. सदर प्रकल्प भारतातील पहिला प्रकल्प असून पिंपरी चिंचवड परिसरातील दिव्यांग बांधवांसाठी याची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी सुरू करण्यात आली असल्याचे मनोजकुमार बोरसे यांनी संगणकीय सादरीकरणादरम्यान सांगितले.
सदर शिबीर दिवंगत डॉ.प्रफुल्ल विजयकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजित केले जाते. हे शिबीर संपन्न होण्याकरिता प्रेडिक्टीव होमिओपॅथीचे संचालक डॉ. अमरीश विजयकर तसेच पुणे येथील डॉ.रजत मालोकार यांनी विशेष पुढाकार घेतला.













