- थेट मावळातून पवनेचं पाणी बंद करण्याचा आमदारांनी दिलायं इशारा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ फेब्रुवारी २०२४) :- पवना प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत पुनर्वसन मंत्री, महसूल मंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावण्याची आम्ही विनंती केली आहे. परंतु, संबंधित अधिकाऱ्यांच्या नकारात्मक भूमिकेमुळे आम्हाला कुठलीही सकारात्मकता दिसत नाही. त्यामुळे १० तारखेपर्यंत निर्णय झाला नाही, तर पवना धरणग्रस्त कृती समितीच्या वतीने पवनेचे पाणी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत पाणी बंद ठेवण्याचा इशारा आमदार शेळके यांनी पत्रकार परिषदेत दिला.
तालुक्यात सुरू असलेले विकासकामे, मंजूर झालेला निधी, शासन आपल्या दारी योजना व विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आमदार शेळके यांनी वडगाव मावळ येथे शासकीय विश्रागृहात पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार शेळके यांनी प्रामुख्याने विकासकामांच्या दर्जासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींनी काळजीपूर्वक लक्ष द्यावे व दर्जेदार पद्धतीने कामे करून घ्यावीत, असे आवाहन केले.
तालुक्यात कोट्यवधी रुपये निधीच्या माध्यमातून अनेक विकासकामे सुरू असून, काही महत्त्वाचे प्रकल्पही सुरू आहेत. असे असताना काहीजण विनाकारण पाठीमागे चुकीची चर्चा करून जनतेची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत, त्यांनी मागून बोलण्यापेक्षा थेट आमसभेत येऊन खुले बोलावे, असे आव्हानही आमदार शेळके यांनी यावेळी विरोधकांना दिले.













