- कर्ज मिळणे म्हणजे आपली बाजारात पत असल्याचे लक्षण आहे..
- महापालिका आयुक्तांकडून आरोपांच निष्कासन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ फेब्रुवारी २०२४) :- महापालिका ४५० कोटींचे कर्ज काढणार असल्याबाबत उलटसुलट चर्चा आहे. मात्र, त्याबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही. कर्ज घेणे पाप आहे का? गरज पडली तरच कर्ज काढण्यात येईल. बाजारात आपली पत काय आहे, हेही वेळोवेळी तपासावे लागते. त्यामुळे महापालिकेने बँकांकडून प्रस्ताव मागवले आहेत, असे स्पष्टीकरण आयुक्त शेखर सिंह यांनी शनिवारी दिले. आयुक्त सिंह यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले की, महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली असून, मोठे प्रकल्प महापालिकेच्या निधीतून करणे योग्य नाही. छोट्या प्रकल्पांसाठी निधीची आवश्यकता असते. महापालिकेच्या वतीने शहरात हरित रुग्णालयांची उभारणी आणि महामार्ग सुशोभीकरणाचे नियोजन सुरू आहे. महामार्गावर पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक उभारण्यात येणार आहे. त्यासाठी कर्ज घेण्याबाबत निविदा प्रसिद्ध केली आहे. विविध बँकांकडून कमी व्याजदराने मुदत कर्ज घेण्यात येईल. सुमारे १२ ते १५ वर्षे कालावधीसाठी कमी दराने कर्ज मिळविण्यासाठी बँकांना आवाहन केले आहे.
नागरिकांना निवासस्थानापासून जवळचे मेट्रो, बसस्थानक, शाळा, महाविद्यालये, बँका आदी ठिकाणी कामानिमित्त पायी जाणे सहज शक्य व्हावे, यासाठी महापालिका हरित सेतू प्रकल्प राबविणार आहे. त्याची शाश्वत अंमलबजावणी करण्यासाठी कर्जरोखे उभारण्याचे महापालिकेचे नियोजन आहे, असेही शेखर सिंह यांनी सांगितले.
आयुक्त म्हणाले की, जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या न्यूयॉर्क महापालिकेवरही ३ लाख ९० कोटींचे कर्ज आहे. त्या कर्जामुळे तेथील विकास थांबलेला नाही. ती जगातील श्रीमंत महापालिका झाली आहे. कर्ज मिळणे म्हणजे आपली बाजारात पत असल्याचे लक्षण आहे.













