- निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह दिले अजित पवार गटाला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ फेब्रुवारी २०२४) :- निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हा अजित पवार गटाला दिले आहे. त्यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून शंका उपस्थित केली जात आहे.
अजित पवार गटच हा खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निकाल निवडणूक आयोगाने दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर पक्ष आणि चिन्हाचा वाद थेट निवडणूक आयोगात पोहोचला होता. यावर आयोगात सुनावणी पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाला लेखी म्हणणं मांडण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. त्यावर आयोगाने हा निकाल दिला आहे.
शरद पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी अजित पवार यांच्या ताब्यात गेल्याने आता शरद पवार गटाकडून चार चिन्ह निश्चित करण्यात आली आहेत. शुक्रवारी संध्याकाळी चार वाजेपर्यंत शरद पवार यांच्या पक्षाला नाव आणि चिन्ह मिळणार आहे. शरद पवार गटाला सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय खुला आहे. त्यामुळे आता शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्यासोबत महाराष्ट्रातील ४१, नागालँड मधील ०७, झारखंड मधील ०१, लोकसभेचे २ खासदार, राज्यसभेचे १ खासदार तर विधानपरिषदेचे ५ आमदार आहेत. शरद पवार यांच्याबरोबर महाराष्ट्रातील १५ आमदार, केरळ मधील १ आमदार, लोकसभा खासदार ४, महाराष्ट्र विधान परिषद ४, तर राज्यसभेचे ४ खासदार सोबत आहेत.
महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना (उद्धव ठाकरे) प्रमाणेच आता शरद पवारांपुढे महासंकट उभे ठाकले असून ते त्यातून कसा मार्ग काढतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
हा पक्ष शरद पवारांचा आहे. आयोगाने त्यांच्यावर अन्याय केला आहे. आयोगाचा हा निकाल अनपेक्षित आहे. त्यामुळे निकालाच्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ. – मा. जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष – राष्ट्रवादी (शरद पवार गट)…