न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ फेब्रुवारी २०२४) :- सिव्हिल कोर्ट स्टेशन ते स्वारगेट स्टेशन अशी ३.६४ किलोमीटर अंतराच्या भुयारी मार्गावर मेट्रोची चाचणी सोमवारी (दि. ५) यशस्वीपणे पार पडली. केंद्रीय रेल्वे सुरक्षा आयुक्तांची पाहणी व चाचणी पूर्ण झाल्यानंतर येत्या काही दिवसांत हा मार्ग प्रवाशांसाठी सुरू होणार आहे. त्यामुळे पिंपरीहून थेट स्वारगेटपर्यंत प्रवास करता येणार आहे.
भूमिगत असलेल्या सिव्हिल कोर्ट स्टेशनपासून स्वारगेटच्या भूमिगत स्टेशनपर्यंत सोमवारी सकाळी मेट्रोची चाचणी घेण्यात आली. बुधवार पेठ स्टेशन, मंडई स्टेशन पार करून मेट्रो स्वारगेटला पोहोचली. चाचणीसाठी एक तास वेळ लागला. चाचणीदरम्यान मेट्रोचा वेगताशी ७.५ किलोमीटर इतका ठेवण्यात आला होता.
सिव्हिल कोर्ट स्टेशन ते बुधवार पेठ स्थानक हा मार्ग मुठा नदीपात्राच्या खालून जातो. नदीच्या खालून मेट्रो जाणे ही दोन्ही शहरासाठी महत्त्वपूर्ण घटना आहे. सिव्हिल कोर्ट स्टेशन ३३.१ मीटर खोल, बुधवार पेठ स्टेशन ३० मीटर खोल, मंडई स्टेशन २६ मीटर खोल आणि स्वारगेट स्टेशन २९ मीटर खोल आहे. चाचणी यशस्वी झाल्याने लवकरच केंद्रीय रेल्वे सुरक्षा आयुक्तांची पाहणी व चाचणी होईल. त्यांनी परवानगी दिल्यानंतर मेट्रोने पिंपरी-चिंचवड महापालिका ते स्वारगेट असा थेट प्रवास करता येणार आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना पुणे शहराच्या मध्यवस्तीत जाणे यामुळे शक्य होईल. तसेच कसबा गणपती, दगडूशेठ हलवाई गणपती, रविवार पेठ, भाजी मंडई, स्वारगेट एसटी स्थानक, तुळशी बाग, सारस बाग, गणेश कला क्रीडा रंगमंदिर, पंडित नेहरू स्टेडियम, मुकुंदनगर, कसबा पेठ, लक्ष्मी रोड, कमला नेहरू रुग्णालय, गाडीखाना, शनिपार चौक, बाजीराव रस्ता आदी ठिकाणी मेट्रोने जाणे नागरिकांना शक्य होणार आहे.