न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ फेब्रुवारी २०२४) :- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी नेते अशोक चव्हाण यांनी सोमवारी काँग्रेसला राम राम केला. ‘मी दोन दिवसांत माझी भूमिका स्पष्ट करेन’ असं अशोक चव्हाण म्हणाले होते. मात्र ते आज मंगळवारीच भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. ANI ने या विषयीचं वृत्त दिलं आहे.
आज दुपारी १२ च्या दरम्यान देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांचा भाजपात प्रवेश होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सहा दशकांपेक्षा जास्त काळ असलेली काँग्रेसची साथ सोडली. अशोक चव्हाण यांचे वडील, माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांनी राज्यात काँग्रेस वाढवली होती. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत अशोक चव्हाण यांनीही काँग्रेससाठी अहोरात्र काम केले. आता सहा शतकानंतर अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम केला. त्यांनी पक्षसदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे.