- दिव्यांचे खांब आणि सुशोभीकरणासाठी आता कोटींची उधळपट्टी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ फेब्रुवारी २०२४) :- महामेट्रोने चिंचवडच्या मदर तेरेसा उड्डाणपूल ते दापोडीच्या हॅरिस पुलापर्यंत मेट्रोची मार्गिका उभारली आहे. हे काम करताना महामेट्रोने महापालिकेने दुभाजकावर लावलेले दिव्याचे खांब काढून टाकले आहेत. त्यामुळे तेथे महापालिका दिव्यांचे खांब बसवून सुशोभीकरण करणार आहे. त्यासाठी तब्बल सहा कोटींची उधळपट्टी केली जाणार आहे. त्या खर्चास आयुक्त शेखर सिंह यांनी मंगळवारी (दि. ६) स्थायी समितीची मंजुरी दिली.
विद्युत खांब व दिवे उभारण्यासाठी महापालिकेच्या विद्युत विभागाने ७ कोटी ९४ लाख २८ हजार ४६८ खर्चाची निविदा काढली होती. त्यात पाच ठेकेदारांनी सहभाग घेतला होता. त्यातील दोन ठेकेदार पात्र ठरले. तो खर्च ५ कोटी ९५ लाख ५५ हजार ४६५ इतका आहे. त्या खर्चास आयुक्तांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे. दिव्यांचे खांब बसविण्याच्या कामाची मुदत चार महिने आहे.
पिंपरी ते दापोडी मार्गावरील दुभाजकांवरील दिव्यांचे खांब महामेट्रोने तोडले. त्यानंतर मेट्रोची मार्गिका तयार करण्यात आली. असे असताना दिव्यांचे खांब पूर्ववत करण्यासाठी मेट्रोकडून रक्कम घेऊन ते दिवे बाजूच्या दुभाजकावर लावण्यात आले, मार्गिकेच्या खालील जागेवर मेट्रोचा ताबा आहे. तेथे मेट्रो जाहिरात फलक लावून उत्पन्न मिळविणार आहे. त्या जाहिराती आकर्षक दिसण्यासाठी महापालिका दिवे लावण्यासाठी कोट्यवधीचा खर्च करीत आहे.
मेट्रो मार्गिकचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्ते पूर्ववत करून सुशोभीकरण करण्याचा दावा महामेट्रोने केला होता. दुभाजकात हिरवळ व रोपे लावून सुशोभीकरण करणार, प्रत्येक पिलरवर व्हेंटिकल गार्डन विकसित करणार, सांडपाण्याचा पुनर्वापर करणार, असे अनेक दावे महामेट्रोने केले होते. मात्र, महामेट्रोच्या कामामुळे दुरवस्था झालेल्या रस्त्यांची डागडुजी महामेट्रोने केलेली नाही. मर्ज इन व मर्ज आऊटसाठी तयार केलेले नवा मार्ग पूर्ववत केलेला नाही. दर्जाहीन काम केल्याने अनेक ठिकाणी दुभाजक तुटून पडले आहेत. दुभाजकात हिरवळ न लावल्याने कचरा व राडारोडा साचला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका विकासकामांसाठी कर्ज काढणार आहे. दुसरीकडे आपले काम नसतानाही तिजोरीतून सहा कोटींचा खर्च करण्यावरून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
निगडी ते दापोडी रस्त्याचे पालिकेकडून सुशोभीकरण करण्यात वेणार आहे. मेट्रो मार्गिकेखालील दोन पिलरमध्ये सुशोभित खांब व दिवे लावण्यात येणार आहेत. हे दिवे डीएमएस प्रकाराचे आहेत. विशिष्ट दिवसानुसार वेगवेगळी प्रकाश व्यवस्था करता येणार आहे. स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताकदिनी तिरंगा रंगाची प्रकाश व्यवस्था करता येईल. त्यामुळे हा मार्ग अधिक आकर्षक दिसणार आहे, त्यासाठी महामेट्रोची परवानगी घेण्यात आली आहे.
-संजय खाबडे, सहशहर अभियंता, महापालिका…










